गुढीपाडवा
गुढीपाडवा
साजरा करणारे मराठी, कोंकणी, कानडी आणि तेलुगू
प्रकार महाराष्ट्रीय
उत्सव साजरा १ दिवस
सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा
दिनांक मार्च / एप्रिल
गुढीपाडव्यात उभारलेली ‘गुढी’
गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.
उत्सवाचे स्वरूप
गुढीचे स्वरूप-
चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात.या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात.गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.
अन्य धार्मिक उपचार-
स्नान इ.दैनंदिन कर्मे झाल्यावर गुढी उभारली जाते. वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करतात. गुरू, वडीलधाऱ्यांना वंदन करावे, अशीही रूढी आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे,असा संकेत रूढ आहे. संवत्सर फल म्हणजे काय? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असते, त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती - जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी असेल ते संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष हे जर मंगळवारी सुरू होत असेल तर मंगळ हा त्या वर्षाचा अधिपती असे समजले जाते. साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते. ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली. तिला पहिले पद मिळाल्याने ती ‘प्रतिपदा’ म्हणून ओळखली जाते असे मानले जाते. या तिथीला ‘युगादी’ तिथी असेही म्हणतात.या दिवशी उपाध्यायाकडून पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रवण करतात. या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे.:-
"तिथेश्च श्रीकरं प्रोक्तं वारादायुष्यावर्धनम् |
नक्षत्राद्धरते पापं योगाद्रोगनिवारणम्
करणाच्चिन्तितं कार्यं पञ्चाङ्गफ़लमुत्तमम् |
एतेषां श्रवणान्नित्यं गङ्गास्नानंफलं लभेत्"
अर्थ - तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते.वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते. नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो. योगश्रवणाने रोग जातो. करणश्रवणाने चिंतिलेले कार्य साधते. असे हे पंचांग श्रवणाचे उत्तमफल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फल मिळते
चैत्र हा अधिकमास असता, काहींच्या मते अधिकमासाच्या शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभाची धार्मिक कृत्ये करावीत; तर काहींच्या मते ती शुद्ध किंवा निज चैत्राच्या प्रतिपदेस करावी, असा मतभेद आहे. याविषयी धर्मसिंधूने निर्णय दिला आहे तो असा- अभ्यंगस्नानादी कृत्ये अधिक मासाच्या शुद्ध प्रतिपदेसच करावी; पण गुढी उभारणे, कडुलिंबाची पाने खाणे, पंचांग श्रवण करणे या गोष्टी शुद्ध चैत्राच्या प्रतिपदेस कराव्या.
एकाच वर्षात दोन गुढीपाडवे
साधारणपणे शालिवाहन शकाच्या एका हिंदू वर्षात वर्षारंभी एक आणि एकच गुढीपाडवा येतो. पण शके १९३८मध्ये दोन गुढीपाडवे आले होते.
८ एप्रिल २०१६पासून सुरू होणाऱ्या शालिवाहन शक १९३८ या नूतनवर्षी वर्षारंभी आणि वर्षअखेरीस असे दोन गुढीपाडवे आले होते. ८ एप्रिल २०१६ रोजी रोजी गुढीपाडवा आलाच होता, पण नंतरच्या वर्षी शके १९३९ च्या चैत्र शुक्ल प्रतिपदा ही क्षय तिथी असल्याने त्या दिवशी, म्हणजे २९ मार्च २०१७ रोजी गुढीपाडवा नव्हता. तो आदल्या दिवशीच्या २८ मार्च २०१७ रोजी आलेल्या अमावास्येच्या दिवशी-सकाळी ८.२७ वाजता फाल्गुन अमावास्या संपल्यावर साजरा करावा लागला.
महाभारतातील उल्लेख
महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात. महाभारतातच खिलपर्वात कृष्ण त्याच्या संवगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा सल्ला देतो. महाभारत ग्रंथातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात.
सांस्कृृतिक इतिहास
ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे.
श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.
शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला.
प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरू केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्यादिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला. काश्मिरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. पार्वती लग्न झाले की माहेरवाशिणी म्हणून महिनाभर माहेरी राहते. तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाते. अक्षयतृतीया यादिवशी ती सासरी जाते. संदर्भ- शक्रोत्सवाचे उल्लेख संस्कृत रघुवंशात व भासांचे ‘मध्यमव्यायोग‘, शूद्रकाचे ‘मृच्छकटिकम्‘ या नाटकांमध्ये आले आहेत.
ध्वजांचे पौराणिक उल्लेख
प्रतिमाविद्या (आयकॉनोग्राफी)च्या अनुषंगाने झालेल्या अभ्यासाच्या दृष्टीने इंद्रध्वज व ब्रह्मध्वज कसे दिसत याबद्दल उपलब्ध वर्णने फारच कमी वाटतात. जी वर्णने उपलब्ध आहेत त्यांच्यांतही आपआपसांत फरक आहे. त्यांमध्ये इतर ध्वजप्रकारांशी सरमिसळही केली गेली आहे असेही दिसते.
रामायण, महाभारत आणि पुराणे असोत, अथवा नाटके, इंद्रध्वजाचे उल्लेख मुख्यत्वे उपमा अलंकाराच्या स्वरूपात आलेले दिसतात. नायकांना इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसतेच पण युद्धांमध्ये धारातीर्थी पडणाऱ्या शत्रुपक्षाच्या नायकासपण इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसून येते.
श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला, अशी पारंपरिक समजूत आहे.
ततोऽभयवकिरंस तव अन्ये लाजैः पुष्पैशच सर्वतः
समुच्छ्रितपताकास्तु रथ्याः पुरवरोत्तमे
ततो हय अभ्युच्छ्रयन पौराः पताकास्ते गृहे गृहे
ऐक्ष्वाकाध्युषितं रम्यम् आससाद् पितुर्गृहम्
हे वाल्मिकी रामायणातील श्लोक आहेत. ह्यांत गुढी असे कुठेही म्हटले नसून पताका हाच शब्द वापरलेला आहे.
गुढी शब्दाची उकल
तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे. दाते, कर्वे लिखित 'महाराष्ट्र शब्दकोशा'चा आधार घेतला तर "गुढ्या घालुनी वनीं राहूं , म्हणा त्यातें ।" असे उदाहरण येते यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी, झोपडी, अथवा पाल (रहाण्याची जागा) असा दिला आहे.
िंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. इथे गचा क (अथवा कचा ग) होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता येते तरीही राहण्याची जागा या अर्थाने 'गुडी' हा शब्द येऊन दक्षिणेतली (आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू) खासकरून आंध्रातील स्थलनामांची (गावांच्या नावांची) संख्या अभ्यासली असता (संदर्भ सेन्सस ऑफ इंडिया - गाव नावांची यादी), लाकूड या अर्थाने तेलगूतील गुढी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड बांबू/काठी ने बनवलेले घर, हे पाहता हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र या प्रदेशात गुढी शब्दाचा प्रचार अधिक असावा. शालिवाहनपूर्व काळात कदाचित गुढीचा लाकूड बांबू/काठी हा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्द संग्रहातून मागे पडला असावा पण आंध्रशी घनिष्ट संबंध असलेल्या शालिवाहन राजघराण्याच्या लाकूड बांबू/काठी या अर्थाने तो वापरात राहिला असण्याची शक्यता असू शकते.
मध्ययुगात हा उत्सव राजा अथवा त्याच्या अधिकाऱ्याकडून साजरा केला जात असे. सात गावांचा अधिपती असलेली व्यक्तीही हा उत्सव संपन्न करीत असे. आता घरोघरी हा उत्सव साजरा होतो.
सौजन्य : विकिपीडिया
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा