खरी नक्कल
भोजराजाकडे एक बहुरुपी गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले.
थोड्याच वेळात हुबेहुब त्या राजाप्रमाणे बनून, तो बहुरुपी राजसभेत शिरला.
त्याचे त्याच्या कलेतील असामान्य
कौशल्य पाहून खुष झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला.
भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरुप्याने तो रत्नहार तर स्विकारला
नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही.
एवढंच नव्हे तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखांन आला, तशाच
तऱ्हेनं निघून जाऊ लागला.
दरबारी मंडळींना त्या बहुरुप्याचा हा उध्दटपणा आवडला नाही.
त्यांच्यापैकी काहीजण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजाने आपल्या
सेवकांना त्या बहुरुप्याला पकडून, आपल्यापुढं हजर करण्याचा
हुकुम सोडला.
त्या
बहुरुप्याला पकडून समोर आणताच राजा त्याला म्हणाला, ‘अरे
उध्दटा ! तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तर तू
स्वीकारला नाहीसच; पण मला मुजर करण्याचं साधं सौजन्यही न
दाखवता, तू मला सरळ पाठ दाखवून निघून की रे गेलास ? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.’
बहुरुपी म्हणाला, ‘महाराज ! सोंग घेतलं असलं,
तरी ते राजाधिराज भोजमहाराजांचं घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून
रत्नहार स्विकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा
आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या
असत्या, तर आपला अपमान झाला असता, म्हणून
मी हुबेहुब आपल्याप्रमाणे वागलो.’
बहुरुप्यानं
केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्याने त्याला दोन-तीन दिवस शाही
पाहूणा म्हणून ठेवून घेतली आणि त्याल तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम
म्हणून दिल्या.
Very Nice
उत्तर द्याहटवा