साधूचा न्याय
एका गावात एक धनवान शेतकरी राहत असे. त्याच्याकडे मुबलक शेती होती. शेती खूप चांगल्याप्रकारे करून तो धनवान झाला होता. त्याला चार मुल होती. ती सुद्धा कष्ट करीत, पण त्यांच्यात सतत कुरबुरी चालू असत. त्यातच तिघांची लग्न एकाच मांडवात केली, त्यामुळे तिन्ही सुना नवीनच होत्या. सुना आल्यामुळे मोठ्या तिघांच्या कुरबुरी वाढल्या होत्या, पण आटोक्यात होत्या. चौथा मुलगा जरा समंजस होता, त्याच लग्न झाल की तो कसा वागतो याकडेच शेतकऱ्याचे लक्ष होते. आपण हयात नसताना यांचे कसे होईल या विचाराने शेतकरी नेहमी त्रस्त असे. कमीतकमी भांडणे व्हावीत यासाठी काही नियम घालून दिले होते. त्याचे पालन मुले करत.
त्याने शेजारच्या गावातल्या वकीलाकडून मृत्युपत्र बनवून घेतले. त्यात आपल्या मृत्युनंतर कोणी किती शेत घ्यावे, पशुधन कसे वाटून घ्यावे हे सर्व लिहून ठेवले. अर्थात मुलांना यातले काहीच माहित नव्हते.
काही महिन्यांनी शेतकरी आजारी पडला. औषध पाणी चालू होते, पण उपयोग होत नव्हता. आजार बळावला. आता आपला मृत्यू जवळ आला आहे हे ओळखून त्याने आपल्या चारही मुलांना मृत्युपत्रा बद्धल सांगितले आणि त्या वकिलाची ओळख करून दिली. त्याच दिवशी रात्री शेतकऱ्याने प्राण सोडले.
दिवस कार्य पार पाडली, आणि सर्व मुलांनी वकिलाला बोलवून घेतले. वकिलास मृत्युपत्र वाचण्यास सांगितले. वकिलाने मृत्यू पत्रातील सर्व मसुदे वाचण्यास सुरुवात केली. शेतीचे विभाजन सर्वांना पटले. दागिन्यांचे विभाजन पटले. घराचे विभाजन न करण्याची त्यांची इच्छाही सर्वांना मान्य झाली. पशुधनही वाटले गेले, आता फक्त एका इमानी कुत्र्याचा प्रश्न होता. कुत्रा फारच इमानदार होता, आणि जवळ जवळ सर्वांचाच लाडका होता. पण याचे वाटप कसे करणार? हा प्रश्न सर्वांना पडला. कुत्रा सर्वांचाच लाडका होता, त्यामुळे कोणी अधिकार सोडायला तयार नव्हत. मग सर्वांनी कुर्त्र्याच्या एकेका पायावर आपला अधिकार सांगितला. पुढचे दोन पाय मोठ्या भावांकडे, मागचे दोन पाय धाकट्या भावांच्या मालकीचे. अर्थात त्याच्या खाण्या पिण्याची व्यवस्था चौथ्या मुलाने अगदी आनंदाने स्वीकारली. सगळे सुरळीत चालले होते. पण दिवसागणिक इतर तीन भावांमधील दुरावा जरा जास्ती वाढत होता.
एकदा त्यांच्या घराच्या पटांगणात कुत्रा खेळत होता. ते मोठ्या भावाला अवडल नाही, आणि त्याने एक फळकुट कुत्र्याच्या दिशेने फेकून मारलं. बिचाऱ्या कुत्र्याच्या मागच्या पायाला ते फळकुट लागल आणि तो जखमी झाला. नेमका हा पाय धाकट्या, (लग्न न झालेल्या) मुलाच्या मालकीचा होता. त्याने पाहिलं, पण भांडण वगैरे न करता मलमपट्टी वगैरे केली. आणि विसरून गेला. जखमेवर व्यवस्थिती पट्टी लावली होती, तरी पाय काही खाली ठेवता येत नव्हता. थोड्यावेळाने कुत्रा भूक लागली असेल म्हणून लंगडत लंगडत स्वयंपाक घरात गेला. तिथे चुलीजवळ पडलेली भाकरी खाण्याच्या नादात त्याच्या पायाला बांधलेल्या पट्टीला आग लागली. कुत्रा घाबरलं आणि तीन पायांवर पळत सुटला. पळत पळत तो जवळच्या शेतात गेला, आणि बघता बघता शेताला आग लागली. तिघा भावांप्रमाणेच ज्याचे लग्न झाले नव्हते त्या मुलाचे शेतही जळाले आणि बिचारा कुत्राही त्यात मरण पावला.
इथे शेतीचे नुकसान झाल्याने तिघेही भाऊ एकमेकांशी भांडू लागले. तिघेही सर्वात धाकट्या भावाला दोष देऊ लागले. कारण त्याने केलेल्या मलमपट्टी लाच आग लागल्याने शेताचे नुकसान झाले असे त्यांचे म्हणणे पडले. आता झालेलं नुकसान तूच भरून दे, असा ठरावच सर्वांनी केला. बिचारा धाकटा भाऊ एकदम दुःखी झाला. चौघेही भाऊ घराच्या समोर भांडण करीत होते. धाकटा भाऊ एकाकी पडला. बिचार्याने खूप विचार केला आणि काय करावे या विवंचनेत घराच्या अंगणात बसून राहिला. त्याचवेळी एक साधू त्याच्या घरावरून जात होता. याला दुःखी कष्टी बघून त्याने याची विचारपूस केली. या मुलाने साधूमहाराजांना प्रणाम करून सर्व हकीकत सांगितली. साधूंनी त्याला घाबरू नकोस असे सांगितले, आणि मला तुझ्या भावांना भेटायला घेऊन चल असेही सांगितले. साधू ने चारही मुलांचे म्हणणे ऐकून घेतले. मुलांनीही साधूच्या मदतीने तंटा सोडवावा असे ठरवले.
सर्व ऐकून घेतल्यावर साधूने सर्वात धाकट्यावर अन्याय होत आहे असे सांगितले. साधू म्हणाला, एक तर तुम्ही सर्वांनी कुत्र्याचे पाय वाटून घेतले, पण त्याच जेवण खाण बिचारा तुमचा धाकटा भाऊ करत होता. शिवाय तुमच्या पैकी एकाने त्याच्या मालकीचा पाय मोडला, परंतु त्याची मलमपट्टीही त्यानेच न कुरबुर करता केली. त्या कुत्र्याला तर तो पायही जमिनीवर टेकवता येत नव्हता. अशा परिस्थिती जेव्हा त्याच्या पायाला आग लागली तेव्हा खरे तर त्याला शेतात जाण्यासाठी उरलेले तीन पायच कामी आले असणार. याचा अर्थ कुत्रा तीन पायांमुळे शेतात जाऊ शकला. त्यामुळे शेताला आग लागण्यासाठी कुत्र्याचे उरलेले तीन पाय कारणीभूत आहेत. ज्या अर्थी चौथा पाय निकामी होता, त्या अर्थी हा दोष त्या पायाचा म्हणजेच पायाच्या मालकाचा नाही. त्यामुळे, या सर्वाला तुम्ही तिघे जबाबदार आहात, आणि आता तुम्ही तिघांनी तुमच्या धाकट्या भावाला भरपाई करून द्यायला हवी.
साधूने दिलेला निष्कर्ष योग्यच ठरणार होता. तिघाही भावांना आपली चूक समजून आली. त्यांनी धाकट्या भावंडाची माफी मागितली, आणि सगळे एकत्र नांदू लागले.
Source - Google
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा