धाडसी झुगी
झुगी नऊ-दहा वर्षांची मुलगी. ती आणि तिचे आईबाबा शेतातील झोपडीत राहत. तिचे आईबाबा शेतात काम करत.सायंकाळ झाली. झुगी अभ्यास करत बसली होती. झोपडीबाहेर कोकरू बांधले होते. झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवला. झुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले आणि विहिरीवर पाणी आणायला गेली.
तेवढ्यात कोकराचा बँऽऽ बँऽऽ ओरडण्याचा आवाज आला. तशी झुगी धावतच झोपडीबाहेर आली. तिला एक लांडगा दिसला. तो कोकराकडे येत होता. झुगी घाबरली. क्षणभर विचार केला. ती झटकन झोपडीत गेली. चुलीतील जळते लाकूड घेऊन बाहेर आली. लांडगा कोकरावर झडप घालणार इतक्यात झुगीने जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले. आगीला पाहून लांडगा घाबरला. तो पळाला. कोकराचा जीव वाचला, ‘पळा पळा, लांडगा आला पळाऽ’, झुगी जोरजोरात ओरडू लागली.
तिच्या आवाजाने शेतात काम करणारे बाबा धावत आले. आईही आली. झुगीने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. आईने तिला जवळ घेतले. बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. झुगीच्या धाडसाची बातमी गावात पसरली. गावच्या सरपंचांनी तिची पाठ थोपटली. शाळेतील शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले.
Source - Google
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा