सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२

रमणचा योग्य न्याय

 रमणचा योग्य न्याय


एका राज्यात रमण नावाचा अत्यंत हुशार तरुण राहत असे. सर्वांशी अदबीने वागणारा आणि समजुतीने बोलणारा म्हणून त्याची ओळख होती. राजाला सुद्धा त्याच्या बद्धल अभिमान होता. बऱ्याच वेळा राज्यातील तंटे सलोख्याने आणि योग्य पद्धतीने सोडवायला लोक रमण कडे येत. क्वचित प्रसंगी राजा सुद्धा त्याची मदत घेत असे.


त्याच गावात चार चोर राहत होते. मिळून चोरी करायचे आणि वाटून घ्यायचे. चोरच ते, त्यांच्यातही एकमेकांबद्धल थोडा अविश्वास होताच. एकदा त्यांनी फार मोठी संपत्ती चोरली. चोरलेले सगळे धन त्यांनी एका पेटीत ठेवले. “हि पेटी सगळीकडे कुठे घेऊन फिरायची? त्यापेक्षा योग्य ठिकाणी ठेऊ” असा विचार चौघांनी केला. त्यांनी असे ठरवले की “गावाच्या वेशीवर एका घरात एक आजीबाई राहते. अतिशय साधी – भोळी आहे. तिच्या घरी कोणी येत जात नाही. तिला काही तरी पटवून हि पेटी तिच्या घरी ठेवू, आणि काही दिवसांनी घेऊन जाऊ.”


चौघेही त्या आजीच्या घरी गेले. तिला म्हणाले “आजीबाई, आम्ही चौघांनी मेहनतीने जे काही धन मिळविले आहे, ते तुझ्या घरी ठेवतो. आम्ही काही कामा निमित्त दुसऱ्या गावात जात आहोत, आलो की पेटी घेऊन जाऊ. तोवर तू ही पेटी सांभाळ. पण आम्ही चौघे एकत्र आलो की च हि पेटी आम्हाला दे.” आजी बाई सुद्धा तयार झाली आणि बर म्हणाली.


चौघेही निघाले. कोसभर अंतर गेल्यावर त्यांना एक दुधवाला दिसला. चौघांना दुध पिण्याची इच्छा झाली, परंतु त्यांच्या जवळ भांडे नसल्याने त्यांनी असे ठरविले की एकाने जाऊन त्या आजी कडून चार पेले घेऊन यायचे. त्याप्रमाणे एक जण आजीच्या घरी निघाला. त्याची मती फिरली. त्याने ठरवल आजीला फसवून ती पेटी घेऊन पसार व्हायचे. त्याने एक युक्ती केली. तो आजीच्या घरी गेला आणि म्हणाला आजीबाई आमचे गावाला जायचे रद्द झाले आहे. तू ती पेटी आम्हाला देऊन टाक. आजीने म्हणले बाकीचे कुठे आहेत? त्याने तिला घराबाहेर बोलाविले आणि कोसभर अंतरावर उभ्या असलेल्या बाकीच्यांकडे बोट दाखविले. आणि खूप हुशारीने त्याने बाकीच्यांना ओरडून विचारले “काय रे आणू ना तिकडे?” इकडे या तिघांना वाटले की हा भांडयाबद्धल बोलतोय. त्यांनीही जोरात “हो” असे उत्तर दिले. आजीबाई ला वाटले खरच यांचा विचार बदलेला दिसतोय. तिने त्याला आत नेले आणि पेटी दिली. याने घराच्या मागच्या दरवाज्यातून पळ काढला आणि पसार झाला. 

बराच वेळ झाला पण अजून चौथा कसा आला नाही हे बघायला उरलेले तिघे आजीबाई कडे आले. त्यांनी आजीबाईला त्या मित्रा बद्धल विचारले. आजीबाईने त्याने “पेटी मागितल्याचे सांगितले आणि तुम्हीही हो म्हणाला म्हणून मी पेटी दिल्याचे” ही कबुल केले. झालेला प्रकार तिघांच्या लक्षात आला. ते आजीबाईवर खूप चिडले. त्यांनी तिच्याकडे भरपाई मागितली. आणि जर तसे केले नाही तर राजाकडे तक्रार करायची धमकी दिली. ती बिचारी काय करणार, म्हणाली जा राजाकडे.


तिघेही राजाकडे गेले. त्यांनी साळसूदपणाचा आव आणत आपण मेहेनतीने मिळविलेल्या पैशाचे नुकसान आजीबाईमुळे कसे झाले वगैरे राजाला सांगितले. राजाने आजीबाईला दोषी ठरविले आणि “१० दिवसात पेटी परत कर नाही तर शिक्षेला तयार राहा” असा न्याय केला. 

आजीबाई रडायला लागली. तिला काहीच कळेना. ती फार दुःखी झाली. तिला कोणीतरी रमणकडे जाण्यास सुचविले. ती रडत रडत रमण कडे गेली. तिने घडलेला सर्व प्रकार  रमणला सांगितला. त्याच्या लक्षात आले, की ते चौघेही भामटे आहेत. त्याने तिला सांगितले काळजी करू नकोस १०व्या दिवशी राजाच्या समोर न्याय होईल.


तो दिवस उजाडला. म्हातारी ते तीन चोर आणि रमण राजदरबारात आले. राजाने रमणची विचारपूस केली आणि म्हणाले तू या आजीची बाजू मांडायला आला असणार हे नक्की. बोल तुला काय म्हणायचे आहे.


त्याने राजाची परवानगी घेऊन आजीला प्रश्न केला “आजीबाई तू ती पेटी त्या चौथ्या मित्राला का दिली?”


आजीने घडलेला प्रकार सांगितला. इतर तिघांनी “हो” असे म्हणल्याने कसा गोंधळ झाला हे हि सांगितले.”


मग रमण ने तिघांना विचारले “तुम्ही हो म्हणाला होतात?”

तिघांनी हे मान्य केले. “पण आमची काही चुकी नाही. आम्हाला आमची पेटी परत पाहिजे.”

रमण ने आजीला विचारले “यांनी पेटी देताना तुला “आम्ही चौघे एकत्र असतानाच पेटी 


द्यायची” असे  सांगितले होते का?” आजीने “हो” असे उत्तर दिले.


रमणने राजाला घडलेल्या प्रकारचे सविस्तर वर्णन केले आणि त्या तिघांना सांगितले “आजीबाई तुम्हाला पेटी देईल. पण तुम्हीच घातलेल्या अटी प्रमाणे तुम्ही चौघेही तिच्याकडे गेलात तरच ती पेटी देऊ शकेल. त्यामुळे तुम्ही चौघांनी एकत्र या. अन्यथा पेटी किंवा भरपाई आजीबाईकडे मागू नका.”


रमणच्या या चतुर न्यायदानावर राजा एकदम खुश झाला. राजालाही एव्हाना हे चौघे चोर आहेत हे समजले होते. परंतु पुराव्याशिवाय न्याय करणे त्याला कठीण जात होते. रमणने दिलेल्या न्यायला राजाने संमती दिली आणि आजीबाईला जोवर चौघे एकत्र येत नाहीत तोवर कुठल्याही प्रकारची शिक्षा होणार नाही याची कबुली दिली.

तिघांनाही कळून चुकले. आपल्याला चौथ्याला शोधून बाहेरच्या बाहेर हा प्रकार संपवायला हवा. त्यानुसार ते तिघेही चौथ्याच्या शोधार्थ बाहेर पडले ते परत आलेच नाहीत.


English Moral Stories

Marathi Stories

Kishor Masik Goshti

Source - Google

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा