मदत
काश्मीर मध्ये आलेल्या महाभयंकर पूरपरिस्थितीचा आढावा घेताना प्रसारमाध्यमांनी पूरग्रस्तांच्या घेतलेल्या मुलाखतीत “सरकार कडून काहीच मदत नाही. आम्हाला कोणीच मदत करायला आले नाही....” असाच साधारण सूर दिसला. प्रसारमाध्यमांनीही त्यांच्या या प्रतिक्रियांचा “योग्य” वापर करून घेतला. हे सगळ बघून कधी एके काळी वाचलेली खूप साधी पण, खूप मोठा अर्थ सांगणारी कथा आठवली.
एकदा एका शेतात एक मोठ्ठे झाड होते. छान डेरेदार वृक्ष होता. त्या शेताचा शेतकरी सधन होता. कामाला गडी बोलवायचा. रोज सकाळी घरातली पूजा वगैरे आटोपली की एखाददुसऱ्या ओळखीच्या गृहस्थाला गाठायचा, त्याच्याशी गप्पा मारत मारत शेतात देखरेखीला यायचा, इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचा आणि या झाडा खाली आराम करायचा. दुपार झाली की जेवायला घरी जायचा. साधारण दिनक्रम असाच असे. पैशाच्या बाबतीत महा कंजूस. कामाला आलेल्या गडी लोकांना वेळच्या वेळी पगार द्यायचा नाही, त्यामुळे तेही देखल्या देवा दंडवत करत आणि कामाची टाळाटाळ करत. काही काम सांगितल की “हो करतो” म्हणत आणि पळून जात.
याच झाडावर एका चिमणा चिमणीचे घरटे होते. घरट्यात हे जोडपे आणि त्यांची ३ छोटी पिल्ल राहत. चिमणा रोज सकाळी त्या शेतात जाऊन आपल्याला लागेल तेवढे दाणे आणत आणि चिमणीला देई. चिमणी पिल्लांना खायला देई आणि उरलेले स्वतः खाऊन घेई. एकदा चिमणा असाच शेतातून दाणे घेऊन आला, तर चिमणी थोडी घाबरलेली दिसली. ती चिमण्याला म्हणाली “अहो, आता आपल्याला घरट्यासाठी नवीन जागा शोधायला हवी. आत्ता तो शेतकरी इथ बसून म्हणत होता, उद्या गडी लोकांना बोलवून कापणी सुरु करायला हवी. शहरात जाऊन कापणीची हत्यार आणायला सांगतो. आता कापणी चालू झाली कि आपल्याला अन्न कस मिळणार? आपण घरट हलवूया कुठे तरी”
चिमणा म्हणाला, “ठीक आहे, अजून काही होत नाही. उद्या बघू.”
दुसऱ्या दिवशी शेतकरी परत त्या झाडाखाली बसून कोणाशी तरी बोलत होता, “अरे, आपल्या गावातले गडी लोक किती आळशी झाले आहेत. आज बोलावलं, आले नाहीत. एकाला हत्यार आणायला शहरात जा अस सांगितलं, तो ही गायब आहे. आता उद्या एक जण शहरातून हत्यार घेऊन येणार आहे अस म्हणालाय, त्याला सांगितल आहे निदान उद्या तरी कापणी चालू करू”, चिमणी हे सगळ ऐकते, आणि चिमण्याला सांगते. चिमणा पुन्हा म्हणतो, “ठीक आहे, अजून काही होत नाही. उद्या बघू.”
तिसऱ्या दिवशी शेतकरी वैतागत, तावातावाने शेतात येतो, झाडाखाली दोन चार गडी लोकांना बोलावतो, आणि खूप दम दाटी करतो. शहरातून हत्यारे आलेली नसतातच. त्यामुळे तो आणखीन वैतागलेला असतो. गडी लोक काम करणार नाही सांगतात आणि निघून जातात. शेतकरी स्वतःशीच बडबडतो “जाऊदे, आपण बाजूच्या गावातल्या लोकांना जरा जास्ती पैसे देऊ आणि उद्या पासून कापणी चालू करू. हत्यार मी घेऊन येतो.” चिमणी हे सगळ ऐकते, आणि चिमण्याला सांगते. चिमणा पुन्हा म्हणतो, “ठीक आहे, अजूनही काही होणार नाही, घाबरू नकोस. उद्या बघू.”
पुढच्या दिवशी, शेतकरी अवजार घेऊन शेतात हजर. पण बाजूच्या गावातले गडी लोक मात्र येत नाहीत. आता, मात्र शेतकरी वैतागतो आणि म्हणतो, “सगळे माजले आहेत. जाऊदे, उद्यापासून मीच कापणीला सुरुवात करतो” आणि तो घेरी निघून जातो.
चिमणी हे ऐकते, आणि चिमण्याला सांगते. आता मात्र चिमणा जे चिमणीला सांगतो ते आपल्या सगळ्यांसाठी फार फार महत्वाचे आहे. “हं, आता आपल्याला घरट हलवायला सुरुवात केली पाहिजे. इतके दिवस हा शेतकरी दुसऱ्यावर विसंबून होता. अमका येऊन काम करील, तमका येऊन काम करील, या विचारात त्याने जवळ जवळ ४ ५ दिवस वाया घालवले आहेत. आणि घाबरू नकोस, मी तू जेव्हा मला पहिल्यांदा हे सांगितलस, त्या दिवसापासूनच दुसर्या एका शेतात घरट बांधायला सुरुवात पण केली आहे. या ४ ५ दिवसात मी अर्ध घरट बांधून ठेवल आहे. याची कापणी होईपर्यंत पूर्ण होईल. जागा पण छान आहे. तो शेतकरी पण हुशार आहे, त्याने जवळच गोदाम बनविले आहे, जिथे तो धान्य साठवतो. आपल्याला एक दोन वर्ष तरी तिथून हलायची गरज नाही. आता इथला शेतकरी स्वतः कापणी करायला तयार झाला म्हणजे कापणी उद्यापासून चालू होईल हे नक्की.”
शेतकऱ्याला समजायला जे चार दिवस लागले, ते चीमण्याने पहिल्याच दिवशी ओळखले. पहिल्या दिवशीच दुसऱ्या घरट्याचे काम चालू केले. आपण असे करू शकत नाही का? आपण शेतकऱ्याच्या मानसिकते मधून कधी बाहेर येणार? चिमणीला / प्राण्यांना जे ज्ञान उपजत असते, ते आपल्याकडे कधी येणार? “आम्हाला कोणी वाचवायला आले नाही” अशीच रड आपण सतत दाखवत राहणार का? सरकार काही मदत करत नाही, सरकारचा एकही माणूस नाही हीच रड आम्ही लोकांसमोर दाखवणार का?
असो, प्रसार माध्यमे कधी बदलतील माहित नाही, पण यदाकदाचित अशी परिस्थिती कधी आलीच, तर मी तत्परतेने कामाला लागेन, उगाच कोणाला दोष वगैरे देत न बसता, मला जमेल तेवढी जास्तीत जास्त मदत करण्यास तयार राहीन हे नक्की.
“हो मी स्वतः सदैव तय्यार असेन”
Source - Google
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा