शिष्याची परीक्षा
प्राचीन काळी गुरुकुल पद्धती होती. तेव्हा आचार्यांकडे तीन शिष्य विद्या ग्रहण करण्यासाठी आहे. आचार्यांनी आपल्या आश्रमामध्ये विद्यादानाचे कार्य सुरू केले.
विद्या ग्रहण करीत असताना आचार्यांच्या सहवासात आश्रमातील दिवस भराभर निघून गेले. शिक्षण पूर्ण झाल्यावर तीनही शिष्य गुरुदक्षिणा देण्यासाठी आचार्यांकडे गेली. तेव्हा आचार्यांनी शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरविले.
दुसऱ्या दिवशी तीनही शिष्य परीक्षेला आले. इकडे आचार्यांनी परीक्षा घेण्यासाठी रस्त्यावर काटे पसरवून ठेवले होते. आचार्यांनी शिष्यांना सांगितले की, “हा काटेरी मार्ग पार करून आश्रमामध्ये प्रवेश करायचे.’ ठरल्याप्रमाणे आचार्य आश्रमात बसून होते.
सर्वप्रथम पहिला शिष्य काटेरी मार्गावरून पायी चालत चालत आश्रमात आचार्याकडे गेला. तेव्हा शिष्याचे पाय पूर्ण रक्तबंबाळ झाले होते. त्यानंतर दुसरा शिष्य काटेरी मार्गावरून पाऊलवाटेतील काटे बाजूला सारून पायाला एकही काटा रुतू न देता आचार्यांजवळ पोहोचला.
नंतर तिसऱ्या शिष्याने हाती झाडू घेऊन रस्त्यावरील काटे झाडून रस्ता साफ केला आणि सर्व काटे जाळून टाकल्यानंतर आचार्यांजवळ आला जेव्हा आचार्यांनी तिसऱ्या शिष्याचे अभिनंदन केले; तेव्हा दोन्ही शिष्यांना आश्चर्य वाटले.
तेव्हा पहिला शिष्य आचार्यांना म्हणाला, “मी कशाचीही पर्वा न करता रक्तबंबाळ होऊन आपल्याजवळ आलो.” दुसरा शिष्य म्हणाला, “मी एकही काटा रुतू न देता सुखरूप आपल्याजवळ आलो.
तेव्हा आचार्यांनी शांतपणे उत्तर दिले, “शिष्योत्तमा, तुला काही गरज नसताना पाय रक्तबंबाळ करून आलास.” दुसऱ्या शिष्याला म्हणाले, “तू काटेरी रस्त्यावरून येताना फक्त स्वतःपुरता विचार केलास.” तर तिसऱ्या शिष्याने मात्र स्वतःचा विचार करून दुसऱ्यांचाही विचार केला. असे आचार्यांनी सांगताच दोन्ही शिष्य निरुत्तर झाले.
तात्पर्य : जीवन जगत असताना स्वतःबरोबरच दुसऱ्यांचासुद्धा विचार करावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा