दुसरी बाजू
सख्ख्या भावंडांची ही गोष्ट. भावबंदकी ही काही कोणाला चुकलेली नाही. साधारण सुखी वाटणाऱ्या घरातही छोटे वाद कधी विकोपाला जातील काही सांगता येत नाहीत. अशाच एका एकत्र कुटुंबात घडलेली घटना. घर अगदी चांगल सुशिक्षित. घराचा मालक अत्यंत कर्तबगार. फार कष्ट घेऊन धन दौलत कमावली, प्रतिष्ठा कमावली. छानशी बायको होती. दोन हुशार मुल होती. त्याचे वडील आणि आणि त्यांच्याच बरोबर राहत असत.
मुलं तशी हुशार पण कधी कधी त्यांच्यात खटके उडत. मुलांमध्ये जेमतेम दोन वर्ष्याच अंतर. दोघेही हुशार. वाचनाची प्रचंड आवड असल्याने, बऱ्याचदा तात्विक चर्चाही होत. पण जस जसे दिवस जात होते, त्यांच्यातल्या चर्चेचा रोख वादात आणि नंतर भांडणात होत असे. दोघेही प्रकांड पंडित होते. अनेक ग्रन्थ वाचूण झाले होते दोघांचे. नुसते वाचनात नाही तर लिखाण आणि वक्तृत्वातही दोघे पंडीत होते. अर्थात असा योग क्वचित असतो. याचा अभिमान त्या दोघांच्या वडिलांना होता.
अनेकदा त्यांच्या वादात त्यांचे वडील मध्यस्थी करत आणि त्यांचा वाद सोडवायचा प्रयत्न करत. कधी कधी ते सफल होत, पण अनेकदा हमरीतुमरी चा प्रसंग आला की वडील “भावनिक आवाहन” वगैरे करून तो वाद तात्पुरता मिटवत. “कधी तरी एकमेकांचा विचार करा”, असे ते सतत सांगत पण ते काही त्यांना पटत नसे.
एकदा वाद विवाद चालू असताना, त्यांनी मध्यस्थी केली आणि त्यांना १० मिनिटे आपापल्या खोलीत जाऊन नंतर येण्यास सांगितले. पोरांनी “ठिक आहे” असे म्हणल आणि आत गेली. इथे वडिलांनी एक ठोकळा आणला. प्रत्येक मुलाच्या खोलीत जाऊन त्यांना झापड असलेले गडद काळे गॅागल दिले आणि ते घालून बाहेर यायला सांगितले. त्यांना दोघांनाही समोरासमोर बसवले. त्यांच्या मधोमध एक भला मोठा ठोकळा ठेवला. तो अशा प्रकारे ठेवला की त्याची फक्त एक बाजू त्यांना दिसेल. मग वडिलांनी त्या दोघांनाही एक प्रश्न विचारला. सांगा बर ठोकळ्याचा रंग कुठला?
दोघांनीही सांगितले “अहो बाबा काळा चष्मा घातला आहे, रंग काळाच दिसतो आहे.”
बाबा म्हणाले, तरी अंदाज सांगा. प्रत्येकाने त्याला जे सुचला तो रंग सांगितला. आता त्यातही वाद घातलाच हे सांगायला नको. मग वडिलांनी त्यांना गॅागल काढून ठेवायला सांगितला. आणि विचारले सांगा आता ठोकळ्याचा रंग कुठला?
मोठा भाऊ म्हणला “ठोकळ्याचा रंग काळा आहे.”
लहान भाऊ म्हणला “चल , ठोकळ्याचा रंग पांढरा आहे.”
झालं या वरून वाद चालू झाला. वडील बाजूला उभे राहून वाद ऐकत होते. त्यांनी दोघांना शांत केले. आणि म्हणाले आता परत माझा प्रश्न निट ऐका. “ठोकळ्याचा रंग कुठला आहे? दोघांनी जरा विचार केला आणि पुन्हा तेच सांगितले.
मोठा भाऊ म्हणला “ठोकळ्याचा रंग काळा आहे.”
लहान भाऊ म्हणला “चल , ठोकळ्याचा रंग पांढरा आहे.”
वडील म्हणाले, एक काम करा, आपल्या आपल्या जागा बदला. आणि सांगा आता काय म्हणणं आहे तुमच.
बाबांना नक्की काय म्हणायचं आहे ते दोघांनाही एव्हाना समजल होत. मग मोठा भाऊ थोडा समजुतदारपणे म्हणाला “माझ्या बाजूने ठोकळा काळ्या रंगाचा आहे.” लहान भाऊ हि म्हणाला “माझ्या बाजूने ठोकळा पांढऱ्या रंगाचा आहे.” दोघांनीही हे मान्य केल, की ते त्यांच्या जागेवर बसून संपूर्ण ठोकळा कसा आहे ते सांगूच शकत नाहीत. शिवाय त्यांनी हे ही मान्य केलं की “समोरचा जे म्हणतो ते चूकच असत असही नाही. फक्त आपण त्याच्या जागेवर जाऊन विचार केला तर त्याचे नक्की काय म्हणणे आहे हे समजेल.”
मग बाबांनी त्यांना समजावले. “तुम्हाला जेव्हा काळा गॅागल दिला, तेव्हा सगळ काळ दिसत होत. जेव्हा गॅागल काढला तेव्हा फक्त तुमच्या बाजूचेच दिसले, पण जेव्हा तुम्ही एकमेकांच्या जागी जाऊन बघितले तेव्हा तुम्हाला कळले कि दुसर्याची बाजूही बरोबर आहे. नेहमीच असे असते. समोरचा काय म्हणतो हे त्याच्या जागी राहून विचार करायची सवय नेहमीच उपयोगी असते.”
आपल्याही आयुष्यात आपण “दुसर्याच्या म्हणण्याला अगदीच धुडकावून न लावता, त्याच्या जागी स्वतःला ठेऊन जरा त्याला नक्की काय सांगायचं आहे याचाही विचार करायला काय हरकत आहे.”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा