श्रेष्ठ दानशूर
एकदा अर्जुन कृष्णा बरोबर असताना , कृष्णाच्या तोंडून कर्णाच्या दानशूर व्यक्तिमत्वाचे कौतुक ऐकतो. “त्याच्या एवढा दानवीर कोणी नाही” असे जेव्हा भगवान कृष्ण म्हणतात तेव्हा अर्जुनाला राहवत नाही, आणि तो म्हणतो “भगवान मला एक संधी द्या, मीही किती दानशूर आहे हे तुम्हाला दाखवून देईन.” कृष्ण मनातल्या मनात हसतो आणि ठिक आहे म्हणतो.
दुसऱ्या दिवशी तो अर्जुनाला एका पर्वता जवळ घेऊन जातो आणि म्हणतो “अर्जुना, या पर्वतात सोन्याच्या खाणी आहेत. आज पासून माझ्या मालकीचा असलेला हा पर्वत तुझा. पण एक अट आहे. या पर्वताच्या पायथ्याशी जे गाव आहे त्यातल्या नागरिकांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे.”
अर्जुन “ठिक आहे” म्हणतो आणि गावातल्या प्रमुखांना बोलवून सांगतो “सज्जनहो, आज पासून मी या पर्वताचा मालक आहे. स्वतः भगवान कृष्णांनी मला तो दिला आहे. मी या पर्वतातील सोन्याच्या खाणीतून मिळणारे सोने तुम्हाला वाटू इच्छितो. पण वाटणी योग्य प्रकारे व्हावी म्हणून मी स्वतः वाटणीच्या वेळी उपस्थित राहणार आहे. उद्या सकाळी सर्वांना एकत्र करा.”
दुसऱ्या दिवशी सर्व ग्रामस्थ एकत्र येतात. अर्जुन स्वतः उपस्थित असतो. परंतु काहींना समान वाटा मिळावा असे वाटत असते, तर काही जणांना “सर्वांना समान वाटा न देता” मुख्य लोकांना थोडा अधिक वाटा मिळावा असे वाटते. काहीं म्हणतात “सोने काढण्याचे आणि शुद्ध करण्याचे काम आम्ही करणार, त्यामुळे आम्हाला अधिक वाटा हवा. “ अनेक जणांची अनेक मते येतात आणि वाद होतात. तोडगा काही सापडत नाही.” अर्जुन सर्वांना सांगतो, “चला आज काही तोडगा निघत नाही. आपण उद्या बसू. सर्वांनी घरी जाऊन यावर विचार करून या.”
दुसरा दिवस उजाडतो. पुन्हा चर्चेला सुरुवात होते. पण तोडगा निघणे दूर, वाद वाढून अगदी मारामारी चा प्रसंग येऊन ठेपतो. मग अर्जुनाला राहवत नाही आणि तो म्हणतो “चला चालते व्हा, मीच काय तो निर्णय घेतो आणि कळवतो तुम्हाला.”
अर्जुन थोडा वैतागून कृष्णाकडे जातो आणि घडलेली हकीकत ऐकवतो आणि विचारतो “भगवन, तूच संग आता मी काय करावे म्हणजे मी सर्वांना न्याय मिळवून देईन?” भगवान कृष्ण म्हणतात “अर्जुना मला वाटल तेच झाल. “मी म्हणत होतो ना की कर्णच खरा दानशूर आहे. तुला कळेल उद्या.”
दुसऱ्या दिवशी सेवकातर्फे कृष्ण भगवान कर्णाला निरोप धाडून त्या पर्वताच्या जवळ बोलावतात. आणि तिथे अर्जुनाला सुद्धा यायला सांगतात.
सकाळी कर्ण , अर्जुन आणि स्वतः कृष्ण पर्वताच्या जवळ जमतात. कृष्ण कर्णाला म्हणतात “हे कर्णा, हा समोरचा सोन्याची खाण असलेला पर्वत मी दोन दिवसापूर्वी अर्जुनाला दिला होता. त्याला फक्त एवढच सांगितल की पर्वत दिला तरी, पायथ्याशी असलेल्या गावकर्यांना योग्य मोबदला मिळायला हवा. पण गेले दोन दिवस त्याला काही हे जमले नाही. त्यमुळे आज पासून हा पर्वत मी अर्जुनाकडून काढून तुला देत आहे. पण अट तीच, पायथ्याशी असलेल्या गावकर्यांना योग्य मोबदला मिळायला हवा. ”
कर्ण एकदम अदबीने कृष्णाला नमस्कार करतो आणि प्रस्ताव स्वीकारतो. लगेच सेवकाकडून गावकर्यांना निरोप धाडतो आणि बोलवून घेतो. गावकरी येतात. भगवान कृष्ण आणि अर्जुन तिथेच असतात. कर्ण गावकर्यांसमोर उभा राहतो आणि म्हणतो “नागरिकहो, काही वेळा पूर्वीच स्वतः भगवान कृष्णाने मला हा सोन्याची खाण असलेला पर्वत मला दिला आहे. आज पासून मी या पर्वताचा मालक आहे. पण या क्षणी मी या पर्वताचे सर्व हक्क तुम्हा गावकर्यांना देतो आहे आणि माझा या वरचा अधिकार सोडतो आहे. गावकर्यांनी सर्वांनी मिळून योग्य त्या प्रकारे याचे वाटप करावे आणि सुखी राहावे.” असे म्हणून तो भगवान श्री कृष्णाला नमस्कार करून निघून जातो.
अर्जुन थोडा विचारात पडतो आणि भगवान कृष्णाना विचारतो “प्रभू, मला या प्रकारातून कर्ण सर्वश्रेष्ठ दानशूर कसा हे समजले नाही. उलट पक्षी त्याने आपली जबाबदारी झटकून गावकर्यांवर टाकली असे मला वाटते. कृपा करून मला समजावून सांग.”
भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणाले “अर्जुना, मोह कसलाही असू शकतो. तुला त्या सोन्याची खान असलेल्या पर्वताचा मोह झाला नाही हे जरी खरे असले, तरी तुझ्या मनात “तूच न्यायदान करू शकतोस, तूच त्या सोन्याचे वाटप करू शकतोस, तू केले नाहीस तर गावकरी सोने कसे वाटून घेतील?” असा भाव निर्माण झाला. तुला जरी सोन्याच्या पर्वतात रस नसला तरी, नकळत का होईना तुझी प्रतिमा सांभाळण्याचा मोह नक्की झाला. पण कर्ण तसा नाही. त्याने गावकर्यांवर जबाबदारी दिली आणि निघून गेला.”
अर्जुनाने मान्य केले आणि मनोमन कर्णाच्या दानशूरवृत्तीला वंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा