माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.
प्राचीनता आणि महत्त्व
महाशिवरात्रीनिमित्त चक्क्याची विशेष पूजा
संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्नी पुराण, शिव पुराण, पद्म पुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे.
आख्यायिका
महाशिवरात्रीला भगवान शंकराने तांडवनृत्य केले अशीही एक आख्यायिका प्रचलित आहे.
एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे. एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला. ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते. सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला. नेमकी ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली. पहाटे एक हरीण तिथे आले. शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरीण म्हणाले मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो.त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळीच म्हणू लागली- "मला मार पण इतराना सोडून दे." हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले. त्याच्या नकळत त्याला त्या रात्री उपवास घडला, पूजा झाली आणि व्रत झाले त्यामुळे तो पावन झाला. हा व्याध आजही आकाशात दिसून येतो असे मानले जाते.
पूजापद्धती
महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात.[१२] शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.
उपवास-
महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक उपवास करतात. काही भक्त दूध आणि फळे असा आहार घेतात. प्रसादासाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार करून ते शंकराला अर्पण केले जातात. खीर, पंचामृत, दूध आणि दुधापासून केलेले पदार्थ नैवेद्यासाठी तयार केले जातात.
शिवरात्रीच्या रात्री काही प्रांतात भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्याचे सेवन करतात. दुधामध्ये सुकामेवा वाटून घालतात आणि ते मसाला दूध पिण्याची पद्धतीही प्रचलित आहे. याला थंडाई असे म्हटले जाते.
महाशिवरात्री पूजेसाठी आवश्यक अशी सामग्री दुकानांमध्ये भाविकांसाठी उपलब्ध करून दिली जाते. भस्म, रुद्राक्ष, रुद्राक्षमाला, त्रिशूल, शंकराच्या मूर्ती, शिवलिंगे, डमरू अशा विविध गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध असतात. बेलाची पाने, पांढरी फुले, हार यांचीही विक्री या दिवशी केला जाते.
भारताच्या विविध राज्यात
दक्षिण भारत-
दक्षिण भारतात आदल्या दिवशी एकभुक्त व्रत केले जाते. म्हणजे आदल्या दिवशी एक भोजन केले जाते. रात्री पवित्र जागी झोप घेतली जाते. नदीत स्नान करून शंकराचे दर्शन घेतले जाते. शिवाला कमल अर्पण करून तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. ऋग्वेदातील सूक्ते म्हटली जातात. तुळशीची पाने आणि पायसाचा (खिरीचा) नैवेद्य आणि यजुर्वेदाचे पठण, बेलाची पाने आणि तीळ घातलेला भाताचा नैवेद्य आणि सामवेदाचे पठण, निळी कमळे वाहून साध्या अन्नाचा नैवेद्य आणि अथर्ववेदाचे पठण केले जाते.
काश्मीर-
काश्मीरमध्ये महाशिवरात्री दरम्यान होणारी बर्फवृष्टी ही पवित्र मानली जाते. शंकराचार्य टेकडी येथील मंदिरात भक्त दिवसभर दर्शनासाठी जातात. विशेष यात्रेचे आयोजन केले जाते. पूजेचे पदार्थ, अक्रोड, कमळाची फुले यांची विक्री करणारी दुकाने मंदिर परिसरात थाटली जातात.
ईशान्य भारत-
आसाम राज्यातील शुक्रेश्वर मंदिर, उमानंद मंदिर या ठिकाणी महाशिवरात्रीला भाविक दर्शनासाठी भेट देतात. यात्रेचे आयोजन करण्यात येते.
ओरिसा-
ओरिसा राज्यात भाविक शिवरात्रीचा उपवास करतात आणि शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतात.
उत्तर प्रदेश-
उत्तर प्रदेशातील वटेश्वर मंदिरात शिवरात्री निमित्त भाविक राजस्थान, मध्य प्रदेश येथून पाण्याची कावड घेऊन पोहोचतात आणि शिवाला अभिषेक करतात. मध्य हिमालयात या दिवशी यात्रा भरते.
इतर भारतीय सणांचे महत्व पहा -
👇👇👇👇👇👇
सौजन्य : विकिपीडिया
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा