सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शुक्रवार, २० जानेवारी, २०२३

न संपणारी गोष्ट

 न संपणारी गोष्ट

न संपणारी गोष्ट

एका राजकन्येला गोष्टी ऎकण्याचा भलताच छंद लागला. कुणालातरी तिच्या जवळ बसून सतत गोष्ट सांगत रहावे लागे. परंतू गोष्ट संपली रे संपली की तिला अस्वस्थता वाटायला लागे !


अखेर एकदा राजाने जाहीर केले, 'जो मनुष्य आतापासून, ते थेट राजकन्येचा विवाह होऊन ती सासरी जाईपर्यंत तिला तिच्या मोकळ्या वेळेत एक न संपणारी गोष्ट सांगत राहील, त्याला मासिक एक हजार सुवर्ण मोहोरांचे वेतन दिले जाईल.'


राजाने राज्यात पिटवलेली ही दवंडी ऎकून राज्यातलेच नव्हे, तर इतर राज्यातलेही अनेकजण तिला गोष्ट सांगण्यासाठी राजवाड्यात आले. पण ताणून ताणून कुणी आपली गोष्ट महिन्या-दोन महिन्यांपेक्षा जास्त ताणू शकला नाही.


एके दिवशी एकजण राजवाडयावर आला व त्याने अशी न संपणारी गोष्ट राजकन्येला सांगण्याची आपली तयारी असल्याचे राजाला सांगितले. राजाने त्याची बसण्याची व्यवस्था केली. थोड्याच वेळात राजकन्या त्याच्यासमोर येऊन बसली आणि त्याने गोष्ट सांगायला सुरुवात केली.-


'एक होते भातगाव नावाचे गाव. त्या गावात आठ मैल लांबीचे, चार मैल रुंदीचे आणि दोन मैल उंचीचे, भातानी भरलेले प्रचंड मोठे कोठार होते. त्या भाताच्या अवाढव्य कोठारामुळेच त्या गावाला 'भातगाव' हे नाव पडले होते.'


शेजारी दुसरे गाव होते. तिकडे चिमण्याच चिमण्या होत्या. म्हणून त्या गावाचे नाव 'चिमणपूर' असे पडले होते.'


राजकन्या उत्साहानं म्हणाली, 'अय्या ! मोठी मजेशीर आहे नाही का ही गोष्ट. पण इतकी मजेशीर असलेली ही गोष्ट न संपणारी आहे ना ?'


गोष्ट सांगणारा म्हणाला, 'न संपणारी आहे, म्हणून तर मी आपल्याला सांगायला आलोय ना? पण कलावती राजे ! आपण आता मध्येच बोलू नका. मी सांगतोय ती गोष्ट निमूटपणे ऎका.'


याप्रमाणे बोलून तो गोष्ट सांगणारा पुढे म्हणाला, 'एकदा काय झालं? कशी कोण जाणे, पण भातगावच्या त्या भाताने भरलेल्या कोठाराची चिमणपूरच्या एका चिमणीला बातमी मिळाली ! ती उडत उडत त्या भातगावच्या कोठारापाशी आली त्या कोठाराला पडलेल्या फ़टीतून आत शिरली. तिनं त्या कोठारातला भाताचा एक दाणा चोचीत धरला आणि ती चिमणपूरला उडून गेली !


'सुहास्यवदनाने चोचीतून दाणा घेऊन घरट्याकडे जाणा-या त्या चिमणीला पाहून दुसरी चिमणी म्हणाली, 'चिमूताई ! चिमण्यांच्या अफ़ाट संख्यावाढीमुळे गावात अनेक चिमणे चिमण्या अन्नान्न करुन मरत असताना, तू आंबेमोहरी भाताचा हा टपोरा दाणा कुठुन ग आणलास?' त्या चिमणीनं खर ते सांगून टाकताच दुसरी चिमणी त्या कोठाराकडे गेली व आत शिरुन त्यातला एक दाणा घेऊन स्वगृही गेली!'


'अय्या ! किती बहारदार त-हेनं सांगता हो ? सांगा सांगा. पुढं काय झालं ते सांगा.' राजकन्या उत्कंठेनं म्हणाली.


'पुढं काय सांगायचं ? जे व्हायचं होतं ते झालं ! तिसरी चिमणी आली, दाणा घेऊन गेली. चौथी चिमणी आली, दाणा घेऊन गेली. पाचवी चिमणी आली, दाणा घेऊन गेली. अकरावी चिमणी आली, दाणा घेऊन गेली .. बत्तीसावी... सत्तरावी....एकशे एकावी चिमणी आली, दाणा घेऊन गेली !'


सहनशीलतेचा अंत होऊन राजकन्या म्हणाली, 'किती च-हाट लावता हो ? कधी संपणार हे तुमचं च-हाट?'


गोष्ट सांगणारा म्हणाला, 'त्या प्रचंड कोठारातलं धान्य संपेपर्यंत, ते संपूण गेल्याशिवाय मला पुढची गोष्ट सांगताच येणार नाही.'


राजकन्या म्हणाली, 'मग त्या कोठारातलं धान्य संपवायलाच तुम्ही दहा वर्षे घ्याल.'


गोष्ट सांगणारा म्हणाला, 'कलावती राजे, तुमचं लग्न होऊन तुम्ही सासरी जाईपर्यंत तरी काही त्या कोठारातलं धान्य संपून जाण्याची शक्यता नाही.'


यावर राजकन्या राजाकडे गेली व म्हणाली, ' मला आजची गोष्ट ऎकत असता, एकंदरीत 'गोष्ट' या गोष्टीचा एवढा वीट आला आहे की, यापुढे मला कुणी गोष्ट सांगू नये, आणि मी ती ऎकू नये, असं वाटू लागलंय !'


गोष्ट सांगणा-याने सुरु केलेल्या गोष्टीचे स्वरुप राजाने राजकन्येकडून समजावून घेतले. तो मनात म्हणाला, ' गोष्ट सांगणा-याने बनवले असले, तरी त्या च-हाटदार गोष्टीमुळेच वीट येऊन, आपल्या कन्येचा एक अतिरेकी छंद सुटला.' राजाने या गोष्टीचा आनंद मानला, आणि न संपणारी गोष्ट सांगायला आलेल्या त्या माणसाला त्यानंतर त्याने गोष्ट न सांगताही, मासिक एक हजार मोहोरांचे वेतन सुरु केले.

English Moral Stories

Marathi Stories

Kishor Masik Goshti

Source - Google

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा