तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही
एका खेडेगावातील कथा आहे. त्या खेडेगावात एक शेतकरी रहात असे. छोटस शेत होत त्याच. साधारण दीड दोन एकर वगैरे असेल. शेतकरी कष्टाळू होता. आपल्या सहचारिणी बरोबर शेतात नित्य नियमाने काम करून भाज्या पिकवायचा. मुख्यत्वे टोमॅटोचे पिक घेण्यात त्याचा हातखंडा होता. लाल रसरशीत टोमॅटो पिकवून शहरात नेऊन विकत असे. त्याला पोटापाण्यापुरता पैसा मिळत होता. खूप ऐशारामात नाही, पण समाधानी आयुष्य होत दोघांच. परंतु, जशी सगळ्यांचीच इच्छा असते, तशी यांनाही “आपण जरा जास्ती पैसे कमवावेत” अशी इच्छा अधूनमधून होतच असे. त्यात, शेतीव्यवसाय म्हणला की चढ उतार आलाच. कधी पिक कमी आल की पैशाची चणचण भासे. बऱ्याचवेळा खराब रस्त्यावरून जाताना टोमॅटो खराब होत आणि भाव कमी मिळत असे. त्यामुळे आपल्या नवऱ्याने एखादी नोकरी करावी, जेणेकरून महिन्याच्या महिन्याला ठराविक पगार तरी नक्की येईल, अशी इच्छा वजा कुरकुर त्याची पत्नी रोज करत असे.
एकदा शहरात जाताना, शहराच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या फूड मॉल मध्ये “कामगार हवेत. महिना पगार रुपये १०,०००/-” अशी पाटी दिसली. त्याने विचार केला, घरी जाताना चौकशी करून जाऊ. त्याने त्याची कामे आवरली आणि जरा निटनेटका होऊन चौकशीसाठी म्हणून तिथे गेला. तिथे त्याला एक फॉर्म देण्यात आला. आणि माहिती भरायला सांगितली. त्याने जेवढी माहिती देता आली तेवढी दिली, आणि पुढच्या सूचनेची वाट बघत बसला. थोड्यावेळाने त्याला एका केबिन मध्ये जायला सांगितले, तिथे बसलेल्या साहेबाने त्याची मुलाखत घ्यायला सुरुवात केली. थोडीफार माहिती विचारून, फूड मॉल मध्ये काय काय काम करावे लागेल, याची माहिती त्याला दिली. त्याचा पगार, वेळ वगैरे या गोष्टी नक्की केल्या. तसा हा पठ्ठ्या एकदम खुश झाला. नंतर, साहेबाने, त्याने भरलेल्या फॉर्म मधील रिकाम्या ठेवलेल्या रकान्यांकडे बघत त्याला सांगितले “इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लिहिला नाही, तो लिहा. शिवाय इमेल आयडी ही लिहा आणि बाहेर बसलेल्या ऑफिसर कडे द्या. ते तुम्हाला कॉल करून बोलावतील.” शेतकऱ्याने त्या साहेबाला मोबाईल, इ मेल वगैरे वापरत नसल्याचे सांगितले. तसा त्या साहेबाने त्याचा चेहरा जरा विचित्र करून, ठिक आहे, आम्ही तुमच्या पत्त्यावर पत्र पाठवतो आणि कळवतो, असे सांगून त्याला कटवले. हा बिचारा आनंदात घरी गेला आणि आपल्याला नोकरी लागली या विचारने निश्चिंत राहिला. पण चार पाच दिवस झाले तरी, पत्र आले नाही म्हणून जरा खट्टू झाला. एकदिवस त्याने मॉल मध्ये जाऊन चौकशी केली असता त्याला समजले की त्या जागेवर कोणाची तरी नेमणूक केली आहे. तो खूपच नाराज झाला. मग त्याने ठरवल नोकरी वगैरे आपल्याला झेपणार नाही. आपण शेतीकडेच लक्ष देऊ.
त्याने एकदम मन लाऊन शेती करायला सुरुवात केली. टोमॅटोवर लक्ष केंद्रित केल. नवीन नवीन प्रकारच्या तंत्रद्यानाचा वापर कसा करायचा हे शिकून घ्यायला सुरुवात केली. तेवढ्याच जागेत जास्ती पिक कसे येईल यासाठी प्रयत्न केले. टोमॅटो आणि इतर एखादी भाजी अशी एकत्र शेती करण्याचा प्रयोग करायचे ठरवले आणि त्यात त्याला यशही आले. टोमॅटो बरोबर मिरचीची शेती होऊ शकते हे त्याला समजले. त्याने त्याचे संपूर्ण लक्ष शेतीवर केंद्रित केले. तसा त्याला फायदाही झाला. पैसेही मिळायला लागले. त्याने त्याच्या शेता लगतची जमीन विकत घेऊन शेती वाढवायला सुद्धा सुरुवात केली.
सगळ सुरळीत चालले होते, पण गावातून शहरात जाताना होणारे टोमॅटोचे नुकसान, हा त्याच्या पुढचा यक्ष प्रश्न तसाच होता. कितीही काळजीपूर्वक न्यायचे म्हणले तरी ३०-४०% टोमॅटो फुटायचे. ते टोमॅटो तसेच फेकून तो परत घरी यायचा.
एकदिवस, त्याने मनाशी काहीतरी ठरवले आणि ते टोमॅटो घरी घेऊन आला. फुटलेले टोमॅटो एका स्वच्छ बादलीत काढून घेतले. टोमॅटोचा गर वेगळा करून घेतला. बारीक साली आणि त्यातल्या बिया वगैरे बाजूला काढून टाकल्या. आणि बायकोला त्या गराचे सूप करायला सांगितले. ते सूप त्याने शेजाऱ्यांनाही दिले. सगळ्यांना टोमॅटो सूप खूप आवडले. आपण असे सूप करून लोकांना विकावे असा विचार करून, त्याने शहरात एक छोटासा गाळा घेतला आणि तिथे “स्पेशल टोमॅटो सूप”चे दुकान टाकले. त्यातून कमाई होऊ लागली. मग त्याने टोमॅटोचे सॉस कसे बनवायचे याची माहिती मिळवली. शेताच्याच बाजूला छोट्याश्या जागेत स्वच्छ स्वयंपाकघरासारखी जागा तयार करून तो घरगुती सॉस बनवून विकू लागला. टोमॅटो केच अप, टोमॅटो प्युरी वगैरे नवीन नवीन गोष्टी बनवू लागला. मग शेतातल्याच मिरच्या वापरून तिखट सॉस बनवले. ते हि लोकांना खूप आवडले. प्रचंड मागणी बघून त्याने मोठ्याप्रमाणावर सॉस बनविण्यासाठी मशिनरी विकत घेतली. शेतीबरोबरच त्याने या जोडधंद्याला खूप लक्ष देऊन वाढविले. आणि पाहता पाहता त्याने मोठ्ठी फॅक्ट्री चालू केली. आणि जवळ जवळ सर्व शहरात त्याने आपला माल खपवायला सुरुवात केली. गावातल्याच शेतकऱ्यांना कामाला ठेवले. योग्य पगार दिला. स्वतः मालक असून त्यांच्यात मिळून मिसळून राहत असल्याने कोणीही त्याच्याविषयी मनात असूया अथवा मत्सर ठेवीत नसे. त्याचे कुटुंब वाढले. खूप पैसा आला. पण मुला बाळांना चांगल्या संस्कारात वाढविले. हे सगळ करताना मुलांच्या मदतीने शेती काम मात्र जोरात चालू ठेवले. एकंदरीत सगळ उत्तम चालू होते.
एका मोठ्या प्रतिथयश फूड मॉलच्या मालकाने या शेतकऱ्याविषयी ऐकले होते. त्यामुळे या शेतकऱ्याला भेटावे असे त्याला फार वाटत होते. एक दिवस तो स्वतः या शेतकऱ्याच्या फॅक्ट्रीमध्ये आला. त्याने शेतकऱ्याशी ओळख करून घेतली. त्याची फॅक्ट्री बघितली. शेतात केलेले नवीन प्रयोग समजावून घेतले. सर्व परिसर पाहून झाल्यावर त्याने शेतकऱ्याचे खूप कौतुक केले. एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक स्वतः येऊन एवढे आपले कौतुक करतो आहे, हे पाहून शेतकरी खूप सुखावला. दोघे चहा घेत असताना त्या कंपनीच्या मालकाने शेतकऱ्याला मार्केटिंग वगैरे कसे करता असे विचारले?
शेतकऱ्याने स्वतःच्या हिमतीवर सर्व खरीददार कसे जोडले, स्वतः बाजारात जाऊन माल कसा विकला हे सांगितले. त्या कंपनीच्या मालकाला इथे जरा काहीतरी कमी आहे असे जाणवले. मग त्याने त्याच्या कंपनीचे मार्केटिंग कसे हाय टेक केले आहे ते सांगितले. इंटरनेट, जाहिरातीचे नव्या पद्धती वगैरे सांगितल्या. निघताना त्याने आपले विझीटिंग कार्ड शेतकऱ्याला दिले, आणि शेतकऱ्याचे कार्ड मागितले. शेतकऱ्याने कार्ड वगैरे छापले नसल्याचे त्या मालकाला सांगितले. त्यावर हसून तो मालक म्हणाला, “अहो महाशय तुम्ही एवढी फॅक्ट्री चालवता आणि तुमच्याकडे विझीटिंग कार्ड नाही? मोबाईल नाही? मेल आयडी नाही? वेब साईट नाही... आश्चर्य आहे. विचार करा तुम्ही बिजनेस सुरु केला तेव्हापासूनच जर तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी असत्या तर आज तुम्ही कुठच्या कुठे पोचला असता. तुम्हाला नाही वाटत मी जे म्हणतोय ते बरोबर आहे?”
शेतकरी त्याचे हे बोल ऐकून काही सेकंद एकदम स्तब्ध झाला. मन काहि वर्ष मागे गेले आणि तो दिवस त्याला आठवला. क्षणभर मनात विचार आला “आपण त्यावेळी केलेली चूक पुन्हा करतो आहोत का?” .... पण दुसऱ्या क्षणी चेहऱ्यावर प्रसन्ना स्मितहास्य करीत शेतकरी त्या मालकाला म्हणाला “साहेब माझ्याकडे जर त्यावेळी मोबाईल आणि मेल वगैरे असता, तर नक्कीच मी आज तुमच्या फूड मॉल सारख्या कुठल्यातरी मॉल मध्ये कारकुनाची किंवा जास्तीतजास्त मॅनेजर ची नोकरी करत बसलो असतो.”
त्याच्या या बोलण्याचा योग्य अर्थ फूड मॉलच्या त्या मालकाला समजला. दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात खोलवर बघितले, आणि तो जुना दिवस आठवून, दोघांनी एक मेकांची रजा घेतली.
एखादी गोष्ट नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा हिम्मत करून, उपलब्ध गोष्टींचा योग्य वापर करत प्रगती करायला हवी. “तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही”
Source - Google
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा