सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२

घेणाऱ्याचे हात खाली

 घेणाऱ्याचे हात खाली 


लहानपणी आपण अकबर बिरबलाच्या अनेक कथा ऐकत आलो आहोत. बर्याचदा या कथांमध्ये अकबराच्या चातुर्याचे वर्णन अथवा हजरजबाबीपणा सांगण्यात आला आहे. अशीच एक कथा. पण नकळत बोध देणारी.

अकबर नेहमी आपल्या दरबारात आलेल्या याचकांची कैफियत ऐकून घेऊन योग्य तो निर्णय देत असे. कधी एकदा बाका प्रसंग आला तर बिरबलाचे मत जाणून घेत असे. बऱ्याचवेळा त्याच्याकडे गरीब याचक काही मदतीची अपेक्षा घेऊन येत. बहुतेक जण काही तरी घ्यायला म्हणून येत. अकबर सुद्धा त्याच्या मनाला पटेल तेवढी मदत करत असे. कोणाला सोन्याच्या मोहरा देई, कोणाला कपडा लत्ता देई, कोणाला मिठाई देई. साधारणतः देण्याचीच वेळ जास्ती असे. चुकुनच कोणतरी त्याला भेटवस्तू देत असे.

एकदा दरबार चालू होता. नेहेमीप्रमाणे याचकांना मदत देताना अचानक अकबराच्या चेहऱ्यावर हसू उमटले. हे हसणे बिरबलाच्या नजरेतून सुटले नाही. बिरबलाने अकबराला या संबंधी विचारले. अकबराने “थोड्यावेळाने सांगतो” असे म्हणून काम चालू ठेवले. दरबारातील याचक मंडळी गेली. काही परदेशी पाहुणे आले होते, त्यांनी भेट घेतली, तेही दरबाराच्या बाहेर गेले. अकबराने बिरबलाला त्याच्या हसण्याचे कारण सांगितले. तो म्हणाला “काय अजब सत्य आहे. घेणाऱ्याचे हात नेहमी देणाऱ्याच्या हाता खालीच असतात. घेणारा नेहमीच देणाऱ्याच्या उपकाराचे ओझे वाहतो. बघ ना. मी इतक्या जणांना पैसा , कपडा वगैरे देतो. तेव्हाही घेणार्याचा हात खाली असतो. मला कोणी भेटवस्तू दिली तरी माझा हात खाली जातो. खरच, घेणार्याचे हात नेहमी खाली असतात हेच खर. .. तुला काय वाटत बिरबल?”

बिरबल मनातल्या मनात जरा हसला आणि म्हणाला “खाविंद, आपण केलेला विचार काही अंशी योग्यच आहे. पण असे नेहमीच होते असे मला काही वाटत नाही. अशा काही गोष्टी नक्कीच आहेत की ज्यात “घेणारा” याचक नसतो. मुळात देणाऱ्याच्या किंवा घेणाऱ्याच्या मनात काय भाव आहे यावर हे सगळ अवलंबून असते. देणाऱ्याच्या मनात निरलस निरपेक्ष भाव असेल तर घेणार्याचे हात वर अशी परिस्थिती येऊ शकते. देणार्याने केलेली कृती ही निरपेक्ष भावनेने केली तरच हे शक्य आहे.”

बिरबलाच्या या उत्तरावर बादशाह थोडा नाराज झाला. “बिरबल तुला नक्की काय म्हणायचं आहे? तुला अस तर म्हणायचं नाही ना, की मी जे दान करतो आहे त्यात माझा अहंकार आहे. तुझे म्हणणे मला बिलकुल पटलेले नाही. मला तू हे पटवून दे की घेणाऱ्याचे हात सुद्धा वर असू शकतात.”

बिरबल म्हणतो, “खाविंद, नक्कीच. मला उद्यापर्यंत वेळ द्या. मी नक्की तुम्हाला पटवून देईन.” बादशाह त्याला परवानगी देतो.

दुसऱ्या दिवशी बिरबल जेव्हा दरबारात जातो तेव्हा थेट अकबराच्या बेगमला भेटायला जातो. तिला पूर्वीच्या राजांनी अनेक बायका कशा केल्या, त्यामुळे त्यांची कशी फरफट झाली असा काहीसा इतिहास सांगतो. ते ऐकून बेगम थोडी घाबरते आणि बिरबलालाच यातून काय मार्ग काढायचा ते विचारते. “राणीसाहेब, आपण बादशाहांकडे जाऊन त्यांच्याकडे या विषयी बोलावे आणि वचन घ्यावे.” हि कल्पना बेगमला पसंत पडते आणि ती तडक अकबराकडे जाते. बिरबलही सोबत असतोच.

बेगम अकबर बादशहाला बिरबलाने सांगितलेला इतिहास ऐकवते आणि विचारते “तुम्ही तर माझे असे हाल होऊ देणार नाही ना?”

अकबराला अचानक झालेल्या या हल्ल्याचे आश्चर्य वाटते. तो मनोमन धास्तावतो, पण वेळ मारून न्यायच्या उद्देशाने बेगमला म्हणतो “शक्यच नाही. मी तुला कधीही दूर करणार नाही. तू विश्वास ठेव माझ्यावर”

परंतु या बोलण्याने बेगम काही खुश होत नाही, ती अकबराला म्हणते “नाही मला वचन हव आहे”

आज नक्की झालय काय बेगम ला? अकबर मनातल्या मनात विचार करू लागतो. पण खूपच हट्ट केल्याने तो बेगमला म्हणतो “मी तुला वचन देतो, मी तुला कधीही अंतर देणार नाही. तुला विश्वास बसत नसेल तर मी तुझ्या डोक्यावर हात ठेऊन शपथ घेतो  ....... .....” आणि असे म्हणल्या बरोबर त्याला एकदम आदल्या दिवशी बिरबलाशी झालेल्या चर्चेची आठवण होते.

बाजूला उभा असलेला बिरबलसुद्धा अगदी प्रसन्न मुद्रेने अकबराकडे बघतो.

अकबर बिरबलाला म्हणतो “अगदी योग्य प्रकारे मला समजावून दिलेस. घेणाऱ्याचा हातही वर असू शकतो. विशेषतः जेव्हा एखाद्या गोष्टीची जबाबदारी घ्यायची वेळ येते तेव्हा त्याचा हात वरच असला पाहिजे. दान घेतानासुद्धा घेणाऱ्याचा हात वर असेल तर त्याला त्याच्या जवाबदारीची आणि देणार्याला त्याच्या निरपेक्ष दातृत्वाची जाणीव होऊ शकते. आज पासून मी केलेले दान हे निरपेक्ष भावनेने करेन.”*जीवनात अशा अनेक प्रसंगी “घेणाऱ्याचा हात वर आणि देणाऱ्याचा हात खाली अशी परिस्थिती येते. मला काही प्रसंगांची माहिती आहे. आपल्याल्या कडे अशी काही उदाहरणे असल्यास नक्की सांगा.


English Moral Stories

Marathi Stories

Kishor Masik Goshti

Source - Google

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा