सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ३१ डिसेंबर, २०२२

प्रामाणिक प्रयत्न

 प्रामाणिक प्रयत्न 

प्रामाणिक प्रयत्न


एकदा एका गावात एक अतिशय गरीब व्यक्ती राहत असे. गरीब असूनही मेहनती आणि कष्टाळू असल्याने गावात त्याला सर्वजण सन्मानाची वागणूक देत. व्यक्ती कष्टाळू आणि मेहनती असली की तिला मान मिळतोच, हे काही नवीन सांगायला नको. परंतु त्याच बरोबर त्याच्या कडे अजून एक गुण होता, तो खूप श्रद्धाळू होता. रोज अंघोळ करून देवळात जाऊनच पुढे आपल्या कामाला जायचा. देवही त्याच्या भक्तीवर खूप खुश होता. बिचारा रोज येतो आपल्याला नमस्कार करायला. नित्य नेमाने फुलं प्रसाद देतो. आपण याच भल करू.


देवाने विचार केला, “त्याची भक्ती, श्रद्धा आहे की अंधश्रद्धा हे आधी तपासून पाहायला हवे.” म्हणून देवाने एक युक्ती केली. त्याने एकदा रात्री त्याच्या स्वप्नात त्याला दर्शन दिले. स्वप्नात त्याने त्याला सांगितले “मी, तुझ्यावर प्रसन्न आहे. तु माझी रोज सेवा करतोस, मला रोज फुलं अर्पण करतोस, मला तुझे खूप कौतुक वाटते. आज मी खुश आहे. मला तुला काहीतरी द्यायचे आहे. पण मी तुझी परीक्षा घेणार आहे. उद्या सकाळी तू जेव्हा उठशील तेव्हा तुझ्या घराच्या दारासमोर एक मोठ्ठा दगड असेल. तू प्रामाणिकपणे तो दगड हलवायचा प्रयत्न करायचा. जर तू असे केलेस तरच मी तुला वर देईन. अन्यथा नाही.” असे म्हणून देव नाहीसा झाला.


हा मनुष्य उठला. स्वप्नातला प्रसंग त्याला तंतोतंत आठवत होता. तो घराच्या बाहेर गेला. बघतो तर काय खरोखरच मोठा दगड दारासमोर होता. त्याला कळले, स्वप्न नक्कीच खरे ठरणार. आपण शर्थीचे प्रयत्न करू आणि तो दगड जितक्या लवकर हलवता येईल तितक्या लवकर हलवू. आणि देवाला प्रसन्न करून. देवाने दिलेले कार्य पार पडण्यासाठी मी रात्रीचा दिवस करेन. पण हा दगड हलविण्यासाठी वाटेल ते करेन, असा निश्चय त्याने केला.

त्याने सुरुवात केली. दगड तसा खूप मोठ्ठा नव्हता पण अवजड होता. वरून, बाजूने, खालून सगळी कडून धक्के मारून झाले. त्याने पहार आणली, दोऱ्या आणल्या, नवनवीन प्रकारची आयुध आणली, पण दगड काही हलेना. दोन दिवस झाले त्याने सगळी काम सोडून दगड हलवायचा एवढाच एक ध्यास मनाशी बाळगून काम चालू ठेवले. अत्यंत शर्थीचे प्रयत्न केले. १० दिवस झाले, बघता बघता महिना झाला तरी दगड काही हलेना. इथे काम धंदा सुटल्याने कमवायचे साधन संपले. पैसा संपला. जेवण घ्यायला पैसे नाहीत, अशी परिस्थिती ओढवली. दगड हलवायचा म्हणून रोजची अंघोळ करून देवाला जायचेही अधून मधून राहत असे. कारण फक्त एकच, देवाने दिलेले काम पूर्ण करायचे. हार पत्करायची नाही. 


थोड्या दिवसांनी शरीरानेही साथ सोडायला सुरुवात केली. आजारी पडला पठ्ठ्या. देव सगळ पाहत होता. त्याला काही राहवलं नाही. एकदा हा मनुष्य झोपला असताना पुन्हा स्वप्नात येऊन दर्शन दिले.


देवाने विचारपूस केली, “काय चालू आहे? असा आजारी का पडलास वगैरे विचारपूस केली.”

तो अत्यंत प्रांजळपणे म्हणाला “देवा तू मागच्यावेळी स्वप्नात येऊन मला एक काम दिलस. मी अगदी मनोभावे, माझा संपूर्ण वेळ तुझ्या दिलेल्या कामासाठी घालवला. अगदी तहान भूक विसरून मी तो दगड हलविण्यासाठी कष्ट केले, त्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे. आणि हे सगळ तुला नक्कीच माहित असणार, तरी तू मला असे विचारून माझी थट्टा करत आहेस?”


देव हसला, आणि त्याला म्हणाला “तू माझी मनोभावे, नित्य नेमाने पूजा करायचास, मला रोज फुलं अर्पण करायचास, गरिबी असूनही तू कधी काम सोडल नाहीस, की कंटाळा केला नाहीस. मला तुझी परीक्षा घ्यायची होती, तुझी माझ्यावर श्रद्धा आहे कि अंधश्रद्धा? पण मला हे सांगताना अतिशय दुःख होते आहे, की या परीक्षेत तू नापास झाला आहेस. मी मागच्यावेळी जेव्हा तुझ्या स्वप्नात आलो होतो, तेव्हा स्पष्ट शब्दात सांगितले होते, की “तुझ्या घराच्या दारासमोर एक मोठ्ठा दगड असेल. तू प्रामाणिकपणे तो दगड हलवायचा प्रयत्न करायचा.” मी अस म्हणलच नव्हत कि तुला तो दगड हलवायचा आहे म्हणून. तू तुझी नित्य नियमित कामे सोडून, काम धंदा सोडून “दगड हलव” असे मी कधी म्हणले? तू निट ऐकले नाहीस. आणि “देवाने दिलेले काम” एवढाच विचार करून ही अवस्था करून घेतलीस. मला खूप वाईट वाटले. पण ठिक आहे, मी तुला तुझी प्रकृती सुधारून, काम करण्यासाठी लागणारी उर्जा परत मिळवून द्यायचे वचन देतो. पण एक लक्षात ठेव प्रामाणिक प्रयत्न करणे महत्वाचे. पण, त्याला मर्यादा असावी. बाकी तू कष्टाळू आहेसच, गरिबी तर तू स्वतःच्या कष्टाने दूर करशील हे नक्की.”


असे म्हणून देव नाहीसा झाला. तो दगड अजूनही त्याच्या दारासमोर आहे. तो रोज अर्धा तास दगड हलविण्यासाठी देतो. आणि मग नित्यनियमाने आपली कामे करतो.


English Moral Stories

Marathi Stories

Kishor Masik Goshti

Source - Google

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा