सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

बोधकथा - पायाखालची माती

 बोधकथा - पायाखालची माती 


आपण जर चुकूनही एखादा मोठ्या व्यक्तीला आपला पाय लागला, तर लगेच त्या व्यक्तीची क्षमा मागतो. त्याच्या पाया पडतो. खरं ना? आपल्या पायाखालची माती आणि डोक्याला लावायला छे…. कोण देणार ती माती, कोण घेणार ते पाप डोक्यावर? होय ना, पण आता मात्र मी गोष्ट सांगणार आहे, ती गोष्ट आहे कृष्णवेड्या भक्तांची. एकदा काय झालं! श्रीकृष्णाची भेट घ्यायची म्हणून नारदमुनींची स्वारी द्वारकेत गेली. तोच त्यांना द्वारपालांकडून बातमी समजली की, भगवान श्रीकृष्ण हे आज दरबारात आले नाहीत, कारण ते आजारी आहेत.


काय? श्रीकृष्ण अन् आजारी? काय झालं काय त्यांना असं म्हणत नारदांची स्वारी सरळ गेली ती श्रीकृष्ण भगवंतांच्या शयनगृहात. तिथं जाऊन त्यांनी पाहिलं तर काय, कृष्ण मंचकावर झोपलेले. दुःखी-कष्टी मुद्रा भोवताली राण्या, सेवक दासदासी उभे सर्वांचे चेहरे चिंताग्रस्त. “अरे, काय झालंय तरी काय कृष्णाला?” नारदांनी प्रवेश करताच चौकशी केली. “अहो, देवांचं आज सकाळपासून खूप डोकं दुखतंय.” एकाने माहिती दिली. “अरे, मग त्यावर काही उपाय केला नाही का?” नारदांनी काळजीपूर्वक विचारले… “मुनिवर! अहो, सर्व उपाय केले. औषधे-मात्रा दिल्या.


चंदनादिक लेप लावले; पण छे, डोके मात्र काही दुखायचे थांबत नाही.’ तेवढ्यात देवानी कूस बदलली. त्यांची ती दु:खी-कष्टी मुद्रा पाहिली मात्र अन् नारदांनी विचारले, “देवा, फार दुखतंय का डोकं?’ “होय रे भक्त नारदा, फारच डोकं दुखतंय. अनेक उपाय केले, पण कशाचा म्हणजे अगदी कशाचाही गुण आला नाही बघ.” श्रीकृष्ण दुःखी मुद्रेने म्हणाले. “अरे, पण देवा – ह्यावर काहीतरी उपाय असेल की!” नारदांनी विचारले. “आहे… त्यावर रामबाण उपाय आहे. पण तो करणार कोण? कारण…..” “देवा, आधी तो उपाय काय, हे तर सांगा.”


तेव्हा देव म्हणाले, “नारदा! त्याचं काय आहे, जर माझ्या कुणी भक्तानं त्याच्या पायाखालची माती मला दिली अन् त्या मातीचा लेप जर माझ्या मस्तकावर लावला ना, तर ही भयानक डोकेदुखी काही क्षणांतच थांबेल.” तो उपाय ऐकला मात्र…. नारदांसह सर्वच जण मोठ्या चिंतेत पडले, कारण आपल्या पायाखालची माती अन् ती पण देवाच्या डोक्याला लावायला कोण देणार? त्या पापाचे धनी कोण होणार? आणि जर हा एकमेव उपाय असूनही तो नाही केला, तर देवाचं दुखणारं डोकं तरी कसं थांबणार? तेव्हा नारदमुनी देवाची परवानगी घेत म्हणाले, “थांबा प्रभू, मी आता जातो आणि भक्ताच्या पायाखालची माती घेऊन येतो.”



असे म्हणून नारदांची स्वारी बाहेर पडली. त्यांनी स्वर्ग-पाताळ दोन्ही लोक शोधले. तिथल्या अनेक कृष्णभक्तांना ते भेटले. पण आपल्या पायाखालची माती देवाच्या डोक्याला लावून ते पाप आनंदानं आपल्या मस्तकी घेणारा एकही भक्त त्यांना तिथं सापडला नाही; भेटला नाही. अखेर नारद पृथ्वीलोकावर आले आणि असा कुणी भक्त भेटतो काय ह्याचा शोध घेऊ लागले. सगळीकडे हिंडून-हिंडून ते दमले, पण त्यांना हवा तसा भक्त काही भेटेनाच.


तोच त्यांना एकदम आठवण आली. त्यांनी ताबडतोब मथुरा-वृंदावनात जाण्याचा निर्णय घेतला. नारदांचा तो ‘नारायण…. नारायण….’ हा स्वर ऐकला मात्र लगेच अनेक गोपगोपीका आपापल्या हातातली कामे अर्धवट टाकून तिथे धावत आल्या. नारदांना भक्तिभावाने वंदन करून त्यांनी विचारले, “देवर्षी, भगवान श्रीकृष्ण कसे आहेत? तुम्ही त्यांना भेटलात का? त्यांना आमची आवण येते का? सारं कुशलमंगल आहे ना?” त्यावर नारदमुनी म्हणाले, “त्याचं काय आहे, सकल द्वारकानगरी मोठ्या आनंदात अन् सुखात आहे…. पण….” “पण काय देवर्षी !


सांगा ना, आमचे भगवान कसे आहेत? त्यांची तब्येत ठीक आहे ना? तेव्हा नारद म्हणाले, “गोपिकांनो, अरे काय सांगू? गेल्या दोन दिवसांपासून श्रीकृष्णांचं फार डोकं दुखतंय. प्रभुंना फार त्रास होतो आहे.’ “अहो मुनिराज, मग त्यावर काही उपाय केला नाही का? औषध-पाणी, मात्रा काही केलं नाही का?” त्या सर्वांनी अधीरतेनं विचारले. “असं कसं होईल? उपाय केले. औषधं दिली.


मात्रा चाटवल्या. चंदनादिक लेप पण लावून पाहिले. परंतु देवांची डोकेदुखी काही बरी होत नाही.” “अहो, मग त्यावर काही उपाय नाही का?” “उपाय ना, एक उपाय आहे. पण तो उपाय करायला कुणीच तयार होत नाही. मला अजून तरी तसा कुणी भक्त भेटला नाही की, जो तो उपाय करेल.” “का? तो उपाय फार अवघड, अशक्य आहे का? सांगा ना, सांगा नारदमुनी, तो उपाय काय आहे? आमच्या देवाला बरं वाटावं म्हणून आम्हाला कोणतं महादिव्य करावं लागेल, ते सांगा. आम्ही ते करू. नाही म्हणणार नाही, मागे सरकणार नाही.”

तेव्हा नारदमुनी म्हणाले, “उपाय तर खरा तसा सोपा आहे. देवांनी असं सांगितलं आहे की, भक्ताच्या पायाखालची माती पाण्यात कालवून तिचा लेप त्यांच्या डोक्यावर लावला तर डोकं दुखायचं लगेच थांबेल.” “अहो, मग त्यात काय एवढं, कुणाही भक्तानं आपल्या पायखालची माती का दिली नाही? त्यात काय अडचण आहे?” “अरे बाबांनो, असे काय करता? कोणता भक्त आपल्या पायाखालची माती देवाच्या डोक्याला लावायला देईल अन् पापाचा धनी होईल? तसं केलं अन् उद्या त्याला जर नरकात जावं लागलं तर?” नारदांचे ते शब्द ऐकले मात्र अन् त्या वृंदावनातल्या गोप-गोपिका भराभर मागे सरल्या.


त्यांनी पटापट आपल्या पायाखालची चिमूटभर माती काढून ती नारदांच्या ओंजळीत द्यायला सुरुवात केली. पाहता-पाहता नारदांची ओंजळ भक्तांच्या पायाखालच्या मातीने भरून गेली. ते एकदम त्या सर्वांना म्हणाले, “अरे, तुम्ही हे काय करता? तुमच्या पायाखालची माती देवाच्या कपाळाला लावायला देऊन पापाचे वाटेकरी का होता? नरकात का जाताय?” तेव्हा एक गोपी मोठ्या धिटाईने नारदांना म्हणाली, “मुनिवर, आम्ही स्वर्गात जायचं का नरकात जायचं; ते आमचं आम्ही पाहू. तुम्ही आधी ही माती घेऊन जा.



तिचा लेप देवाच्या डोक्याला लावा. आधी देवाला बरं वाटू द्या…. आणि….” ती गोप-गोपिकांनी दिलेली माती उपरण्यात बांधून घेताना नारदांनी विचारले, “आणि काय….?” तेव्हा ते सर्व गोप-गोपी मोठ्या विनम्रभावे म्हणाले, “नारदमनी, आमच्या देवाला हे सांगा की, आज आम्ही आमच्या पायाखालची माती देवाच्या कपाळी लावली म्हणून आम्ही जर नरकात गेलो, तर त्याला म्हणावं, आमचा उद्धार करायला तू तेथे ये.”


नारदांनी ती भक्तांनी दिलेली भेट घेतली अन् ते तत्काळ द्वारकानगरीत येऊन हजर झाले. उपरण्यातली वृन्दावनातील भक्तांच्या पायाखालची माती पाण्यात कालवली अन् त्याचा लेप कृष्णाच्या मस्तकावर लावला मात्र….काही क्षणांतच देवाची डोकेदुखी कुठल्या कुठे पळाली! तेव्हा आनंदलेल्या श्रीकृष्णांनी नारदांना विचारले, “भक्त नारदा, आपल्या पायाखालची माती देणारे भक्त तुला कुठे भेटले? त्यांनी मला काही निरोप, सांगावा दिला आहे का?” देवाचं ते बोलणं ऐकलं मात्र…. देव आपल्याला वारंवार ‘भक्त नारदा, भक्त नारदा’ असे म्हणत आहेत.



आपणही आपल्याला ‘मी भगवंतांचा श्रेष्ठ भक्त आहे’ असे मानतो, म्हणवून घेतो. होय ना? मग मला आपल्या पायाखालची माती देवाच्या मस्तकी लावायला द्यावी अशी बुद्धी का झाली नाही? ह्याच गोष्टीची त्यांना खंत वाटू लागली. त्याचबरोबर भक्त हा भगवंताशी किती एकनिष्ठ हवा, हे सुद्धा नारदांना ती गोपगोपिकांची बोलकी कृती सांगून गेली.


तात्पर्य : भगवंताची भक्ती एकनिष्ठ हवी. माझा देव प्रसंगी माझा उद्धार करायला नरकात सुद्धा येईल, असा भक्ताच्या मनात दृढ विश्वास हवा.

स्त्रोत : Google

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा