सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १० सप्टेंबर, २०२२

बोधकथा : मूठभर पोहे

 बोधकथा : मूठभर पोहे


निखळ मैत्री म्हणजे नेमकं काय; मैत्री कशी असावी, ती कशी जपावी, कशी सांभाळायची, कशी टिकवायची- ह्या गोष्टी सांगणारी, शिकवून जाणारी गोष्ट म्हणजे श्रीकृष्ण अन् सुदामा ह्यांची गोष्ट! – कृष्ण आणि सुदामा हे दोघं अगदी बालपणापासूनचे एकमेकांचे जीवलग मित्र! सांदिपनी ऋषींच्या आश्रमात त्या दोघांनी एकत्र विद्याभ्यास केलेला. आश्रमातसुद्धा त्यांची एकमेकांवर फार मोठी प्रीती. जे काही हाती मिळेल, ते सुदामा चिमणीच्या दातानं तोडून अर्ध करून; आधी ते तो कृष्णाला भरवायचा अन् मागचं जे राहील ते आपण खाऊन प्रेमानं तृप्तीची ढेकर द्यायचा.


आश्रमातल्या प्रत्येक कामात सुदामा कृष्णाला मदत करायचा. त्यांचा अभ्यास, वाचन, पठणही एकत्रच चालायचं. त्या आश्रमातलं शिक्षण संपलं अन् त्या दोघा मित्रांमध्ये एक दुराव्याचं अंतर निर्माण झालं. पुढे जाऊन कृष्ण तर इतका मोठा झाला की, तो द्वारकेचा राजा बनला. पण बिचारा सुदामा तो मात्र गरीब अन् गरीबच राहिला. चंद्रमौळी पडक्या-गळक्या झोपडीत राहायचा. फाटकं-तुटकं वस्त्र अंगावर घालायचा.


मात्र ह्या दोन्ही भिन्न-भिन्न परिस्थितीत ते दोघं राहत होते. तरी पण त्याच्या मनातली मैत्री, परस्परांबद्दलचं प्रेम, आस्था, जिव्हाळा हा तसूभरपण कमी झाला नव्हता. श्रीकृष्ण राजसुखात होता तरी, त्याला आपल्या मित्राची नेहमीच आठवण यायची; तर गरीब सुदामाला माझा मित्र हा द्वारकेचा राजा आहे, असं सांगताना त्याची छाती मित्रप्रेमानं भरून यायची. सुदामा आपल्या गरीब परिस्थितीत ठेविले अनंते’ ह्या भावाने प्रेमाने, आनंदाने व समाधानाने राहत होता.


एक दिवस सुदाम्याची बायको त्याला म्हणाली, “अहो, श्रीकृष्ण तुमचा जीवलग मित्र आहे. तो तुमचा देव, सखा-सवंगडी इतकंच नव्हे, तर सर्वस्व आहे. खरं ना? मग एकदा त्याच्याकडे जा…. त्याच्याकडे काहीतरी मागा. तो आपल्याला नक्कीच काही ना काही तरी मदत करेल. तुम्ही त्याच्याकडे जाऊन काहीतरी मागून तरी बघा.’ सुदामा तसा नव्हता. त्याला कुणाकडे आपल्यासाठी काहीतरी मागावं, हा विचारच पटत नव्हता. तो नेहमी म्हणायचा, ‘जे आणि जेवढं आपल्या भाग्यात आहे, ते अन तेवढंच जर मिळणार हे खरे आहे; तर मग कुणाकडे अन् काय मागायचे?’ पण बायकोने जेव्हा फार हट्ट केला, तेव्हा सुदामा श्रीकृष्णाकडे जायला तयार झाला.


पण मित्राकडे रिकाम्या हाताने कसे जायचे? असं सुदामाला वाटत होतं, कारण एवढ्या मोठ्या श्रीमंत मित्राला देण्यासारखं त्याच्याकडे खरंच काही नव्हतं, तो फार फार गरीब होता. शेवटी सुदाम्याच्या बायकोने कोरड्या पोह्याची एक छोटी पुरचुंडी बांधून दिली. अन् तीच घेऊन तो द्वारकाधीश श्रीकृष्णाला भेटायला त्याच्या नगरीत आला.


आपला मित्र सुदामा आपल्या भेटीला आला आहे, हा समाचार मिळताच श्रीकृष्ण धावत धावतच त्याला भेटायला गेला. त्याने मोठ्या प्रेमानं सुदाम्याला प्रेममिठी मारली. त्या भेटीनं सुदाम्याचे डोळे पाणावले. इतका मोठा होऊनही कृष्ण आपली मैत्री विसरला नाही, हे पाहून सुदाम्याचा ऊर भरून आला. श्रीकृष्णाने सुदाम्याला आपल्या महालात आणले. त्याचे पाय धुतले. त्याला सुगंधी स्नान करवले, भरजरी वस्त्रे-अलंकार- सर्व काही घालायला दिलं.


मग सुदाम्याजवळ बसत कृष्णाने त्याला विचारलं, “मित्रा, सर्व काही घरी ठीक आहे ना? माझी वहिनी कशी आहे? मुलं कशी आहेत?” “देवा, तुझ्या कृपेनं सारे जण ठीक आहेत.” सुदामा म्हणाला. आणि मग श्रीकृष्णाने विचारले, “काय रे, माझ्या वहिनीने माझ्यासाठी काही दिलं नाही का?” सुदाम्याकडे बायकोनं दिलेली मूठभर कोरड्या पोह्याची पुरचुंडी होती, पण ती एवढ्या मोठ्या श्रीमंत मित्राच्या हातात द्यायची कशी; ह्या कल्पनेनं त्याचा हात मागे-मागे येत होता. श्रीकृष्णानं खूपच आग्रह केला.


मागणी केली, तेव्हा सुदाम्याने ती पोह्याची पुरचुंडी कृष्णाच्या हाती दिली. कृष्णाने ते कोरडेच पण मित्रप्रेमाने ओतप्रोत भिजलेले पोहे मोठ्या प्रेमानं खाल्ले. सुदाम्याला धन्यता वाटली. श्रीकृष्णाच्या मनाची विशालता, मित्राची श्रीमंती-वैभवापेक्षा त्याच्या मनाच्या मोठेपणानं सुदामा पुरताच चकित झाला. तीन-चार दिवस द्वारकेला शाही पाहुणचार घेतल्यानंतर बालपणीच्या आठवणी आठवून आनंदानं मन तृप्त झाल्यानंतर सुदामा आपल्या घरी परत जायला निघाला. दोघाही मित्रांनी एकमेकाला प्रेमळ निरोप दिला.खरंतर, बायकोनं कृष्णाकडे आपल्यासाठी काही तरी मागा, असं सांगून-सवरून सुदाम्याला कृष्णाकडे पाठवलं होतं; पण सुदामजीनं मात्र आपल्या ह्या वैभवसंपन्न मित्राकडे काहीच मागितलं नाही. उलट, आपल्या घरी परतत असताना सुदाम्याने अंगावरची भारी वस्त्रे, अलंकार काढून ठेवले. आपली फाटकी-तुटकी वस्त्रे अंगावर परत चढविली आणि तो परत निघाला. श्रीकृष्ण मित्राला निरोप द्यायला पुढे आला.

पुन्हा एकदा प्रेममिठी घालून सुदामा म्हणाला, “देवा, येतो बरं, असाच लोभ राहू दे’, असं म्हणत भरल्या डोळ्यांनी सुदामा आपल्या घराकडे परत फिरला. रुक्मिणी कृष्णाला म्हणाली, “नाथ! हे काय, सुदाम्यानं काही मागितलं नाही, पण तुम्ही तरी समजून काही द्यायला नको होतं का?” “देवी! अगं जो अनन्यभावे शरण येतो ना, त्याला सारं काही न मागताच मिळत असतं.”


श्रीकृष्णाचं हे म्हणणं अगदी खरं होतं, कारण सुदामा त्याच्या घरी जाण्याआधीच कृष्णानं त्याचं सारं घर संपत्ती, धन-धान्य अन् वैभवाने भरून टाकलं होतं. सुदाम्याने हे ओळखले की, आपल्या मित्राने मूठभर पोह्याच्या बदल्यात हे एवढं सारं देऊ केलं आहे. त्या जगावेगळ्या मित्र-प्रेमाने सुदाम्याचे मन भरून आले.


तात्पर्य : मैत्री कराल तर अशी करा, अशीच करा आणि अशीच टिकवा.

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा