सरदार वल्लभभाई पटेल
(जन्म : नडियाद, ३१ ओक्टोबर १८७५; - १५ डिसेंबर १९५०)
हे भारतातील एक राजकीय व सामाजिक नेते होते.
वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एक संघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली.
वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा,आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७ च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.
वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
जन्म व कौटुंबिक जीवन
वल्लभभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म लेवा पटेल समाजामध्ये, त्यांच्या मामांच्या नडियाद (गुजरात) येथील घरी झाला. त्यांची अचूक जन्मतारीख ज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रिक परीक्षेच्या वेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ऑक्टोबर अशी लिहिली होती. पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई खेडा जिल्ह्याच्या करमसद गावचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई (विठ्ठलभाई - पुढे राजकारणीही झाले) ही त्यांची मोठी भावंडे होती. त्यांना एक काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती. बालपणी वल्लभभाई वडिलांना शेतीत मदत करत असत. ते १८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२/१३ वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले. वल्लभभाई मॅट्रिकची परीक्षा तुलनेने उशिरा, म्हणजे वयाच्या २२व्या वर्षी उत्तीर्ण झाले. इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात वल्लभभाई पटेल वकिलीची परीक्षा पास झाले. त्यानंतर गोध्रा येथे झवेरबांसोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरुवात केली. तिथल्या बार कौन्सिलमध्येही नाव नोंदवले. झवेरबांपासून त्यांना दोन अपत्ये झाली - १९०४मध्ये मणीबेन आणि १९०६मध्ये डाह्याभाई. गुजरातमध्ये त्या वेळी ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती. या काळात त्यांनी स्वतःच्या कुटुंबास सुरक्षित स्थानी हलवले. वल्लभभाई गोधरा, बोरसद व आणंद भागात वकिली करत असताना करमसदच्या घराची जबाबदारीही सांभाळत होते.
स्त्रोत : विकिपीडिया
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा