महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे : लोणावळा
लोणावळा हे भारतातील राज्य महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे. लोणावळा पुण्यापासून रस्त्याने ६४ किमी तसेच मुंबईपासून ९६ किमी अंतरावर आहे. लोणावळा चिक्की हा एक चवीने आंबट गोड असलेला सुप्रसिद्ध पदार्थ आहे. लोणावळा हे मुंबई व पुण्यामधील एक अतिमहत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. पुण्यातून येथे येण्यासाठी उपनगरीय लोकल रेल्वेगाड्या असतात. मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो.
लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजीचे मुख्यालय आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर समुद्रसपाटीपासून ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.
पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. उन्हाळ्यात जांभळे आणि करवंदांची लयलूट असते.
लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. राजमाची पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स ॲन्ड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर किल्ले ही त्यांपैकी काही ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील शुद्ध देशी गीर गायीच्या दुधापासुन बनवलेल्या साजुक तुप आणि मधात तळलेली चिक्की तर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे. रोज ५००० टन चिक्की निर्यात केली जाते.
इतिहास
लोणावळा हे यादव साम्राज्याचा भाग होते. नंतर मुघलांना या जागेचे व्यूहात्मक महत्त्व लक्षात आल्याने त्यांनी ते काबीज केले आणि बराच काळ ताब्यात ठेवले. या भागातील किल्ल्यांनी आणि मावळ्यांनी मराठा आणि पेशवा राज्यांच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावली आहे.१८७१मध्ये तेव्हाचे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी लोणावळा आणि खंडाळा शोधले.
लोकसंख्या
२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार लोणावळ्याची लोकसंख्या ५७,६९८ होती.[४] ५३.४७% पुरुष तर ४६.५३% स्त्रिया आहेत. लोणावळ्याचे साक्षरता गुणोत्तर ८९% आहे. लोणावळ्यातील १०% लोकसंख्या ही ६ वर्षाखालील मुलांची आहे.
लोणावळा आणि खंडाळा यांच्या आसपासची पर्यटनस्थळे
खंडाळा
हे एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. येथून मुंबई दिशेला जाणाऱ्या बोरघाटाची उतरण सुरू होते.
राजमाची पॉईंट
राजमाची पॉईंट लोणावळ्यापासून ६.५ किमी अंतरावर आहे. येथून शिवाजी महाराजांचा राजमाची किल्ला तसेच आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य बघता येते.
टायगर पॉईंट
टायगर पॉईंट हा एक उंचावरील कडा आहे. जेथे सरळ उभी अशी ६५० मीटरची खोल दरी आहे.
कार्ला लेणी
लोणावळ्याजवळच्या मळवली येथे असलेल्या कार्ला लेण्यांची निर्मिती बुद्ध भिक्षूंनी ख्रिस्तपूर्व २ ऱ्या आणि ३ ऱ्या शतकात केली. येथे एकवीरा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.
लोहगड किल्ला
मळवली रेल्वे स्थानकापासून ११.२ किमी लांबीच्या चढाईच्या रस्त्याने, एकेकाळी शिवाजी महाराजांचा लष्करी तळ असलेल्या या लोहगड किल्ल्याला पोहोचता येते. लोहगडसमोरच विसापूरचा किल्ला आहे.
भुशी धरण
लोणावळा आणि आयएनएस शिवाजीमध्ये असलेल्या धरणाजवळील हा धबधबा प्रसिद्ध आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे टर्मिनस उभारले जाणार आहे जेणेकरून लोणावळा रेल्वे स्थानकावरील ताण कमी होईल व पुणे उपनगरी रेल्वेसाठी विशेष टर्मिनस मिळेल.
वाहतूक
लोणावळा रस्ता व रेल्वेमार्गे भारतातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग याजवळून जातो व त्यास लोणावळ्यासाठी प्रवेशमार्ग आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ लोणावळ्यातूनच जातो. लोणावळा रेल्वे स्थानक पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील अतिमहत्त्वाचे स्थानक असून येथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. येथे दौंडप्रमाणेच मोठे रेल्वे जंक्शन उभारले जावे अशी प्रवाशांची अनेक शतकांपासून मागणी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा