सागरगोटे
मुलींचा देशी खेळ. सागरगोटा (गजगा) हे एक काटेरी झाड आहे. त्याला काटेरी शेंगा येतात, त्या शेंगांच्या आतील बिया म्हणजेच सागरगोटे होत. ह्या बिया टणक, गुळगुळीत, गोलसर( सु. १· ५ सेंमी. व्यासाच्या) व करड्या रंगाच्या असतात. मुली हे सागरगोटे खेळण्यासाठी घेतात. हे ज्या संख्येने घेतले जातात, त्यांवरून खेळाला वेगवेगळी नावे पडली आहेत: उदा., एरखई (एक सागरगोटा), दुरखई (दोन सागरगोटे), तिरखई (तीन सागरगोटे), पाचखाच( पाच सागरगोटे), सातभात (सात सागरगोटे), नऊखऊ (नऊ सागरगोटे), अकराबकरा (अकरा सागरगोटे). हा बैठा खेळ असून तो खेळण्याची रीत अशी : एक मुलगी प्रथम सगळे सागरगोटे उजव्या हातात घेऊन ते एकदम जमिनीवर टाकते. त्यांतून एक वर टाकण्यासाठी उचलून हातात घेते, त्याला खडा घेणे असे म्हणतात. खडा वर फेकलेला असतानाच जमिनीवरचा एक सागरगोटा, इतर सागरगोट्यां ना धक्का न लागू देता, उजव्या हाताने उचलून वरचा खडा झेलायचा. असे सगळे सागरगोटे एकेक करून घेतले जातात. ह्या प्रकाराला एरखई असे नाव आहे. दुरखई म्हणजे, खडा वर टाकून तो अधांतरी असतानाच, जमिनीवरचे दोन सागरगोटे एकदम उजव्या हातात घेऊन त्याच हाताने वरचा खडा झेलायचा. ह्याच क्रमाने तिरखई, चौखई, पाचखई, सहाखई, सातखई, आठखई, नऊखई व दहाखई खेळली जाते. ह्यानंतर हंडी खेळतात. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांपैकी एक असा : ओंजळीत सगळे सागरगोटे घेऊन ते वर फेकायचे व पुन्हा दोन्ही हातांच्या पाठीवर झेलायचे. झेलताना एखादा सागरगोटा खाली जमिनीवर पडला, तर डाव जातो. खडा खेळता आला नाही, जमिनीवरचे सागरगोटे उचलता आले नाहीत किंवा उचलताना इतर सागरगोट्यां ना धक्का लागला, तर डाव जातो आणि दुसरी मुलगी एरखईपासून खेळायला सुरुवात करते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा