सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

रविवार, १० एप्रिल, २०२२

उड्या व उड्यांचे खेळ


उड्या व उड्यांचे खेळ 

 अतिप्राचीन मानवाला स्वसंरक्षणार्थ धावणे, उड्या मारणे, पोहणे, झाडावर चढणे यांसारख्या गोष्टी कराव्या लागत.

त्यात पारंगत असावे लागे. त्यातूनच पुढे काही क्रीडाप्रकार निर्माण झाले. त्यांपैकी उड्या मारणे या प्रकारात लांब उडी मारणे, उंच उडी मारणे, काठीच्या साहाय्याने उडी मारणे इ. उड्यांचे विविध खेळ प्रचारात आले. उड्यांवर आधारित असे अनेक खेळ कालांतराने उगम पावले. दोरीवरील उड्या, सूरपारंब्या, गारूड्याच्या उड्या, अडथळा शर्यत, शारीरिक कसरतीमधील उड्या, घोड्यावरील उड्या, पोहण्याच्या शर्यतीतील उड्या, सूर मारणे इ. अनेक प्रकारच्या उड्यांचे खेळ व शर्यती आज प्रचलित आहेत.


उड्या मुख्यत: एक अथवा दोन्ही पायांनी माराव्या लागतात. त्यासाठी पायातील मांड्यांच्या, पिंढऱ्यांच्या व कुल्ल्याच्या स्‍नायूंचा उपयोग होतो व त्यांना व्यायाम मिळून ते पुष्ट बनतात. विशिष्ट उड्यांसाठी विशिष्ट प्रकारचे व्यायाम घेऊन पायांचे स्‍नायू पुष्ट बनवावे लागतात व त्यासाठी सातत्याने सराव करावा लागतो. प्राचीन काळापासून सर्व देशांत उड्या व उड्यांचे खेळ खेळले जात असत. ईजिप्तमध्ये या खेळांची सुरुवात होऊन त्यांचा प्रसार ग्रीस व इतर देशांतही झाला असावा. भारतामध्येही उड्यांचे व उड्यांच्या खेळांचे अनेक प्रकार फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. हल्ली उड्यांच्या खेळात बरीच प्रगती झाली आहे. अर्वाचीन ⇨ ऑलिंपिक क्रीडासामन्यांत व त्या धर्तीवर चालणाऱ्या इतर आंतरराष्ट्रीय सामन्यांत सामान्यतः उंच उडी, लांब उडी, लंगड-झाप-उडी व बांबू-उडी या चार प्रमुख उड्यांचा समावेश होतो.


लांब उडी : या उडीत लांबून धावत येऊन वेग आणणे, फळीवर डावा वा उजवा पाय टेकून उशी घेणे, हवेतील उड्डाण व जमिनीवर उतरणे या चार क्रिया महत्त्वाच्या आहेत. लांब उडीसाठी ३·७ मी. × ७·६१ मी. चा वाळूचा खड्डा तयार करतात व उड्डाण घेण्याची फळी वाळूच्या खड्ड्यापासून ३·०४ मी. अंतरावर जमिनीत पुरतात. लांब उडीचा जागतिक विक्रम १९६८ च्या मेक्सिको ऑलिंपिकमध्ये रॉबर्ट बीमन या निग्रो खेळाडूचा असून तो ८·९० मी. आहे.


उंच उडी : यासाठी लांब उडीच्या सारखा वाळूचा खड्डा लागतो. त्याच्या काठावर इंच वा सेंमी. च्या खुणा व भोके असलेले दोन खांब ठोकळ्यासहित असतात. ठराविक उंचीवर दोन्ही खांबांच्या ठोकळ्यावर काळ्या व पांढऱ्या पट्ट्यांची त्रिकोणी दांडी असते. उंच उडी मारण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यात कात्री उडी पद्धत, ईस्टर्न कट् ऑफ, गुंडाळी उडी, पायफाक उडी, पाठीचा सूर हे प्रकार विशेष प्रचलित आहेत. दांडी न पाडता मारलेली उंच उडी, दांडी पार केल्यावरच उंच उडी म्हणून समजण्यात येते. निरनिराळे खेळाडू आपापल्या सवयीप्रमाणे वरील पद्धतींपैकी एखादी पद्धत वापरून उंच उडी मारतात. जागतिक उंच उडीचा विक्रम रशियाच्या व्हेलरी ब्रुमेल याचा २·३८ मी.चा आहे (१९६३).


लंगड-झाप-उडी : या उडीत लांब उडीप्रमाणे लांबून धावत येऊन सवयीप्रमाणे उजव्या वा डाव्या पायाने फळीवरून उशी घेऊन प्रथम त्याच पायावर लंगडी घ्यावयाची. नंतर दुसऱ्या पायावर पुढे पाऊल टाकून त्यावरूनच उशी घेऊन शेवटी उडी घ्यावयाची व वरील क्रमाने प्रथम लंगडी, नंतर पाऊल व शेवटी उडी मारून लंगड-झाप-उडी पूर्ण करावयाची असते. प्रथम उडी घेतलेल्या फळीपासून शेवटी उडी घेऊन जेथे पाऊल टेकले असेल, तेथपर्यंतचे अंतर लंगड-झाप-उडीत मोजले जाते. लंगड-झाप-उडीचा जागतिक उच्चांक रशियाच्या व्हिक्टर सॅनेयेव्ह याचा १७·३९ मी. आहे. (१९६८).

बांबू उडी : या उडीत लांब बांबूच्या (४·८ मी. ते ५·४ मी.) साहाय्याने उंच उडीप्रमाणे उडी मारावयाची असते. बांबू सारख्या जाडीचा व भक्कम असावा लागतो. हाताची पकड घसरू नये म्हणून त्याला हात धरण्याच्या जागी कापडी नवारीची फीत गुंडाळतात. खेळाडू डावा हात खाली व उजवा हात वर ठेवून बांबू धरतो. नंतर ठराविक अंतरावरून मोजून पावले टाकून धावत खांबाकडे येतो. त्यावेळी बांबू जमिनीस समांतर धरावा लागतो. शेवटी खांबाच्या खालील घसरड्या त्रिकोणी खाचेत बांबूचे खालचे टोक रोवून तो पायाने जोरात उशी घेतो. बांबूच्या साहाय्याने उंच जातो, शरीर उचलून दांडीच्या पलीकडे पाय व शरीर क्रमाने नेतो, बांबूला झटका मारून बांबू मागे रेटतो व स्वतः दांडीपार होऊन पलीकडील वाळूत पायावर उतरतो. अलीकडे काचतंतूंचा बांबू वापरतात. या उडीचे तंत्र अवघड आहे. बांबूच्या उडीचा जागतिक विक्रम अमेरिकेच्या रॉबर्ट सीग्रेनचा ५.४० मी. चा आहे (१९६८).

धावत येऊन उंच उडी व लांब उडी घेतात त्याचप्रमाणे जागच्या जागी उभे राहून उंच उडी व लांब उडी घेण्याचाही प्रकार आहे परंतु  तो विशेष लोकप्रिय नाही. शारीरिक कसरतीत दोन मुठींचा घोडा व उडी मारण्याचा घोडा या दोन प्रकारच्या घोड्यांवरून उड्या व कोलांट-उड्या मारतात. तसेच जमिनीवरील कसरतीत मागची कोलांट-उडी व पुढची कोलांट-उडी, तसेच हात-पाय-चक्र अशा विविध प्रकारच्या उड्या मारतात. या उड्यांना विशेष चापल्य व शरीरावर ताबा या गुणांची आवश्यकता असते.


धावण्याच्या शर्यतीत अडथळा-शर्यत व स्टीपल चेस नावाच्या उड्या मारत पळण्याच्या शर्यती आहेत. अडथळा-शर्यतीत ठराविक अंतरावर १·०६ मी. उंचीचे अडथळे ठेवलेले असतात व त्यावरून उड्या मारीत पळत जावे लागते. स्टीपल चेस (तट्ट्यांचे व पाण्याचे अडथळे असलेली शर्यत) शर्यतीत तर ९१·४ सेंमी. उंचीचे अडथळे व ३·८० मी. रुंदीचे पाण्याचे अडथळे असतात.


डोंबारी-गारूडी लोक शारीरिक कसरतीचे प्रयोग करतात. त्यात उलट्या सुलट्या कोलांट-उड्या, दहा-पंधरा माणसे जमिनीवर निजवून त्यावरून लांब उडी, अशा विविध प्रकारच्या उड्यांचे कौशल्य दाखवितात. मुले सुरपारंब्या नावाचा खेळ खेळतात. त्यात झाडावर चढणे व खाली उड्या मारणे महत्त्वाचे असते. दोरीवरील उड्या विविध प्रकारच्या असून त्यात दोन्ही हातांत ठराविक लांबीची दोरीची टोके धरून दोरी अंगावरून खाली फिरवून उड्या मारतात. पायात चपलता येण्यासाठी व व्यायामासाठी त्याचा उपयोग होतो.

मलखांबावर मारावयाच्या उड्यांचे पुष्कळ प्रकार आहेत. त्यात पायांचा व उड्यांचाच वापर विशेष आढळतो. पोहोण्याच्या शर्यतीत उंचावरून पाण्यात सूर मारणे म्हणजे उडी मारणेच. यात ताणफळीवरून मारावयाच्या व चबुतऱ्यावरून मारावयाच्या उलट्या-सुलट्या कोलांट-उड्या, सूर, पाकोळी उडी इ. अनेक प्रकारच्या उड्या असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा