बोधकथा - सुधारण्याची संधी
एकदा बुद्ध आणि पाचशे भिक्खूचा संघ राजगृह येथून नालंदा नगराच्या दिशेने प्रवास करीत होते. त्यावेळी’ ‘सुप्रिय’ नावाचा एक संन्यासी त्यांच्या पाठोपाठ निघाला. सुप्रिय बरोबर त्याचा ‘ब्रह्मदत्त’ नावाचा एक शिष्यही होता. बुद्ध आणि भिक्खूच्या मागून चालताना सुप्रिय विविध प्रकारे बुद्ध, धम्म आणि त्यांचा संघ यांच्याबद्दल अपशब्द बोलत होता. तो विविध प्रकारे बुद्धांची निंदा करीत होता. त्याचवेळी ब्रह्मदत्त मात्र त्यांची स्तुती करत होता. सुप्रिय वारंवार बुद्धांबद्दल अपशब्द उच्चारायचा तर ब्रह्मदत्त त्याचे मत खोडून काढायचा.
चालता चालता बराच वेळ निघून गेला. सूर्य मावळतीकडे झुकायला लागला. सूर्यास्तानंतर तथागत रात्रीच्या मुक्कामासाठी ‘अंबलट्ठिका’ नावाच्या एका प्रशस्त बागेत पोहचले. तेथे एके ठिकाणी सर्वांनी तळ ठोकला. सुप्रियही ब्रह्मदत्तसोबत तेथेच थांबला. तिथेही ते दोघे बुद्ध, धम्म आणि संघ यांच्याविषयी परस्परविरोधी मतं मांडत होते. हे सारं घडत असताना भिक्खू मात्र शांत होते. रात्र झाली. सर्वजण शांतपणे झोपी गेले.
बुद्धांचे काही भिक्खू मात्र सुप्रियच्या बोलण्याने प्रचंड अस्वस्थ झालेले होते. ही सारी माहिती आपण बुद्धांना सांगितली पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात सतत सुरू होता. याच विचारात ते झोपी गेले. रात्र संपली, सूर्योदय झाला. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. त्यावेळी सारे भिक्खू उठले आणि एका झाडाखाली एकत्र जमले. सुप्रियने केलेल्या निंदेवर त्या सर्वांची चर्चा सुरू झाली.
अनेकजण त्या टीकेमुळे अस्वस्थ झाले होते. तेवढ्यात बुद्ध तेथे आले. सर्वांनी त्यांना नम्रतेने वंदन केले. बुद्धांच्या समोर सारे जण खाली बसले. त्यांच्याकडे बघत बुद्ध त्यांना म्हणाले, ”भिक्खूनो, आता तुम्ही कशाची चर्चा करीत होता?” एक भिक्खू उभा राहिला आणि नाराजीच्या सुरात म्हणाला, ”भन्ते, आम्ही सुप्रियबद्दल बोलत होतो. काल प्रवासात सुप्रिय सतत तुमच्याबद्दल अपशब्द बोलत होता, तुमच्यावर, धम्मावर आणि संघावर कठोर शब्दांत टीका करत होता.
त्याच्या या वागण्यामुळे, टीकेमुळे आम्ही अस्वस्थ आहोत. तो असा कसा काय वागू शकतो?” त्याचे बोलणे संपल्यावर दुसरा भिक्खू उभा राहिला आणि म्हणाला, “तथागत, सुप्रिय विविध प्रकारे तुमच्यावर टीका करत असताना त्याचा शिष्य ब्रह्मदत्त मात्र तुमची स्तुती करत होता. तो तुमच्याबद्दल अतिशय आदराने बोलत होता. तो नक्कीच सद्गृहस्थ असला पाहिजे.’ बुद्धांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. स्मित करत ते अतिशय हळुवारपणे म्हणाले, “अरे, सुप्रिय असो वा अन्य कुणी असो, माझी निंदा करीत असेल, तर तुम्ही त्याच्याविषयी नाराजी बाळगू नका.
कुणी आपली निंदा करीत असेल, तर त्याला शत्रू मानू नका. कुणी माझी, धम्माची वा संघाची निंदा केल्यावर तुम्ही रागावला किंवा उदास झाला, तर त्यामुळे तुमचीच हानी होईल, नुकसान होईल. जर कुणी माझ्याविषयी अपशब्द बोलत असेल, तर तुम्ही चिडू नका, रागावू नका, अस्वस्थ होऊ नका. उलट त्याचे म्हणणे तपासा. त्याच्या बोलण्याची शहानिशा करा. तो जे बोलतोय त्यात खरेपणा आहे का याची तपासणी करा.
जर त्याच्या टीकेप्रमाणे एखादा दुर्गुण आपल्यात असेल, तर तो दूर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपली चूक आपण दुरुस्त केली पाहिजे. आपली होणारी निंदा ही आपल्यातील दोष दूर करण्यासाठी आपल्याला मिळालेली एक संधी आहे, असा विचार करा. याउलट, जर कुणी आपली स्तुती करत असेल, तर आपण उगाच अत्यानंदी वा प्रसन्न होऊ नये. तसे झाले तर त्यातही तुमचीच हानी आहे. भिक्खूनो, कुणी तुमची स्तुती केली, तर तुम्ही खरेखोटे तपासले पाहिजे. ही गोष्ट योग्य आहे का, ती आपल्यात आहे का, हे तपासून पाहिले पाहिजे. जो असे वागतो, तोच ज्ञानी समजला पाहिजे.”
बुद्धांचे म्हणणे ऐकून अस्वस्थ झालेले सारे भिक्खू शांत झाले. त्यांना आपली चूक कळली. बुद्धांना वंदन करून त्यांनी क्षमा मागितली. तेव्हा बुद्ध त्यांना म्हणाले, “आता तरी तुम्ही टीकेने अस्वस्थ होणार नाही ना? आता तरी तुम्ही स्तुतीने हुरळून जाणार नाही ना ? अरे, निंदा असो वा स्तुती, तिच्या आहारी जाऊन अस्वस्थ होणे चूकच. स्वतःचा विवेक जागा ठेवा. स्वतःची चिकित्सा करत दुर्गुण दूर करण्याचा प्रयत्न करा. तुमचे कल्याण होईल.” सर्व भिक्खूनी बुद्धांना अभिवादन केले आणि ते पुढील प्रवासासाठी सज्ज झाले.
तात्पर्य/बोध – निंदा ही सुधारणेची एक संधी आहे.निंदेमुळे माणसाने निराश होऊ नये. स्तुती आणि निंदा यांच्या आहारी न जाता त्यांची चिकित्सा केली पाहिजे, त्यांचा खरेखोटेपणा तपासला पाहिजे. त्यानुसार स्वतःमध्ये योग्य त्या सुधारणा केल्या पाहिजेत.
स्त्रोत : Google
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा