सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

गुरुवार, ५ मे, २०२२

महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे : कोयना अभयारण्य

 महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे : कोयना अभयारण्य 


कोयना अभयारण्य हे   महाराष्ट्रातील अभयारण्य असून सातारा जिल्ह्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक  घनदाट जंगलांमध्ये कोयना अभयारण्याचा समावेश होतो.  हे अभयारण्य कोयना धरणाच्या भिंतीमागील शिवसागर जलाशयाच्या कडेकडेने पसरलेले आहे. इतिहासात हे जंगल जावळीचे खोरे म्हणून प्रसिद्ध आहे. अभयारण्याचे याचे एकूण क्षेत्रफळ ४२६ चौ.किमी असून याला १९८५ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला.या अभयारण्याला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जाही मिळावा म्हणून राज्य सरकार प्रयत्‍नशील आहे.

इतिहास वर नमूद केल्याप्रमाणे हे अभयारण्य कोयना जलाशयाच्या कडेकडेने पसरलेले आहे.


 कोयना नगर ते महाबळेश्वरच्या जवळील तापोळा या ६०-७० किमी अंतरापर्यंत नदीच्या कडेकडेने हे जंगल आहे. ढोबळमानाने अभयारण्याचे तीन मुख्य विभाग पडतात महारखोरे, वासोटा व मेट इंदवली. त्यामध्ये इंदवळी, कुसावळी, सिंधी, बलवण, मोरवी, म्हाळुंग, वाघावळे, कुसापूर, तापोळा, कांदाटकी खोरे अशा गावांच्या वनक्षेत्रांचा समावेश होतो. शिवसागर तलावाची नैसर्गिक तटबंदी या अभयारण्याला लाभली आहे. धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणावर येथील जंगल पाण्याखाली गेले. जलाशयाच्या पश्चिमेकडील बाजूसच अभयारण्याचा बहुतांशी भाग येतो जो अतिशय घनदाट आहे. अभयारण्याच्या पश्चिमेकडे नदीच्या एका बाजूला सह्याद्रीची मुख्य रांग आहे व दुसऱ्या बाजूस सह्याद्रीची उपरांग आहे. या दोन्ही रागांमधोमध कोयना नदी वाहते. मुख्य रांगेचा उतार नदीच्या बाजूला सौम्य आहे तर पश्चिम बाजूला ९० अंशाचा कडा आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच कडा जो बाबू कडा नावाने ओळखला जातो, तो येथे आहे. 


अभयारण्यातील सर्वोच्च ठिकाण वासोटा किल्ला आहे उंची साधारणपणे ११०० मीटर. एकाबाजूला नैसर्गिक कडा व दुसऱ्या बाजूला मानवनिर्मित जलाशय, यामुळे येथील जंगलाला एक प्रकारचे जंगलतोडीपासून अभय मिळाले आहे. कोयनेबरोबरच सोळशी व कांदाटी याही नद्या अभयारण्यात वाहतात. जून ते सप्टेंबर या महिन्यात प्रचंड पाऊस पडतो. एका वर्षाची पावसाची सरासरी अंदाजे ५००० मिमी इतकी आहे.


जंगलाचा प्रकार


येथील जंगलाचा समावेश दमट विषववृत्तीय सदाहरित जंगलात होतो. महाराष्ट्रात असे जंगल इतरत्र केवळ महाबळेश्वर येथे आहे. जंगलतोड कमी असल्याने महाराष्ट्रात इतरत्र न आढळणारे वृक्ष कोयना जंगलात दिसून येतात. प्रचंड वृक्ष, त्याखाली मध्यम उंचीच्या वनस्पती (कारवी, वाकटी या सारख्या), त्याखाली नेच्यासारख्या वनस्पती व त्याखाली गवतासारख्या वनस्पती असे एकाच जागी ४ स्तरातील वनस्पतींनी येथील जंगल घनदाट केले आहे. तसेच विविध प्रकारच्या लहान, मोठ्या आणि अजस्र वेलींनी देखील येथील इंच न्‌ इंच व्यापला आहे. अंजनी, जांभूळ, हिरडा, आवळा, ऐन, आंबा, भोमा, काटक, उंबर, जांभा, बिब्बा शिकेकाई, गारंबी, करवंदे, रानमिरी, तोरण, धायटी, कडीलिंब, मुरुडशेंग या येथे आढळणाऱ्या वनस्पती आहेत.


प्राणिजीवन


पश्चिम महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांची सर्वाधिक घनता या अभयारण्यात आहे. जंगल अतिशय घनदाट व दुर्गम असल्याने वन्यप्राण्यांची गणती करणे येथे अवघड आहे. हरिणांमध्ये सांबर, भेकर व पिसोरी आढळतात. इतर प्राण्यांमध्ये माकडे, वानरे,तरस, कोल्हे, खोकड, ऊदमांजरे, साळिंदर तसेच रात्रीच्या वेळात रानससे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात, ट्रेकर्सना येथे  नेहमी अस्वल दृष्टीस पडते व आमनासामना होतो. वन्यप्राण्यांच्या भयापोटी पूर्वी बरेचसे ट्रेकर्स फटाके वाजवत फिरत, परंतु आता अभयारण्यात फटाके उडवण्यास बंदी आहे. बिबट्याचेही दर्शन नशीबवंताना होते. ठश्यांवरून व रात्रीच्या डरकाळ्यांच्या आवाजावरून या अभयारण्यात वाघ आहेत हे सिद्ध होते परंतु ते सहसा दिसत नाहीत. अजून येथील खास वैशिट्य म्हणजे येथील राक्षसी खारी. त्यांना मराठीत शेकरू म्हणतात. येथील शेकरू भीमाशंकर येथे आढळणाऱ्या शेकरूपेक्षा थोडीशी वेगळी आहे व गडद रंगात आहे. पक्ष्यांमध्ये येथे स्वर्गीय नर्तक, धनेश व इतर अनेक प्रकार पहायला मिळतात.


सापांच्या अनेक प्रजातीत नाग, फुरसे घोणस व मण्यार या चारही महत्त्वाच्या विषारी जाती येथे आढळतात. त्याच बरोबर चापडा ज्याला इंग्रजीत बांबू पिट वायपर म्हणतात तोही आढळतो. विनविषारी सापांमध्ये अजगर, धामण इत्यादी आढळतात. सुमारे ५६ प्रकारचे सरीसृप येथे नोंद केले आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा