महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे : नान्नज
नान्नज अभयारण्य याला माळढोक अभयारण्य असेही म्हणतात. हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे अभयारण्य आहे व याचे क्षेत्रफळ १,२२९ चौ.कि. मी इतके आहे. यात सोलापूर व नगर जिल्ह्यातील मोठ्या भूभागाचा समावेश होतो. हे अभयारण्य मुख्यत्वे माळढोक या पक्ष्याच्या संरक्षणासाठी तयार केले आहे. कुठल्याही एका पक्ष्यासाठी एवढा मोठा भूभाग संरक्षित करण्याची ही दुर्मिळ घटना आहे.
जंगलाचा प्रकार
महाराष्ट्रातील या अभयारण्याचा भाग हा पूर्णतः पर्जन्यछायेत येतो व महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा भागांमध्ये गणला जातो. त्यामुळे येथे झाडांनी व्यापलेला प्रदेश अतिशय नगण्य आहे. येथील जंगल हे मुख्यत्वे गवताळ आहे व काटेरी वनस्पतींनी व्यापलेले आहे. बाभूळ, आपटा, नीम,शीसव, मापटी, तारवाड, अमोणी, कांचारी यासारख्या वनस्पस्ती या जंगलात आहेत. मराठी साहित्यात या जंगलाचा गवताळ वाखर असा उल्लेख केला आहे.
प्राणिजीवन
वर नमूद केल्याप्रमाणे माळढोक हा येथील मुख्य वन्य पक्षी आहे. अत्यंत दुर्मिळ प्रजाती असलेल्या येथील माळढोकांची संख्या एवढा मोठा भूभाग संरक्षित करूनही अजूनही चिंताजनकरीत्या कमीच आहे. येथे मोठ्या प्रमाणावर काळवीट दिसून येतात. तसेच भारतीय लांडगा येथे आढळून येतो. अशा प्रकारचे जंगल भारतीय लांडग्याचे मुख्य वसतीस्थान असते. इतर प्रमुख प्राण्यांमध्ये खोकड, मूंगूस व तरस येथे आढळून येतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा