स्वातंत्र्य दिन
(१५ ऑगस्ट)
हा भारताचा विशेष महत्त्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.इतिहास
इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.
दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला.
स्वतंत्र भारत
स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताची राज्यघटना तयार करण्यात बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा मोलाचा वाटा होता. प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ह्यांनी लिहिलेले वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले.
स्वातंत्र्य दिनाचा उत्सव
लाल किलल्यावर स्वातंत्र्यदिन उत्सव
भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते. सर्व शाळा, महाविद्यालये-कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. भारताचे पंतप्रधान हे दरवर्षी भाषण देतात. या दिवशी लाल किल्ला येथे भारताचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. त्यादिवशी बहुतांश रेडिओ केंद्रावर तसेच दूरदर्शनवर देशभक्तिपर गाणी, कार्यक्रम, चित्रपट लागतात.
अमृत महोत्सव
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१ साली देशभरात साजरा होत आहे. या दिवसाचे विशेष औचित्य साधून देशभरात विविध सामाजिक, ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
स्त्रोत : विकिपीडिया
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा