भेंड्या
पाठांतराच्या आधारावर रचलेला एक करमणुकीचा खेळ. नव्या अभ्यासक्रमात मुलांच्या पाठांतराला पूर्वी इतके महत्त्व राहिले नसल्यामुळे हा खेळ आता तितकासा प्रचलित नाही. तरीही पुष्कळ मुले एकत्र जमली म्हणजे अनेक वेळा हा खेळ खेळतात.
भेंड्या खेळण्यासाठी दोन मुले वा त्याहून जास्त मुलांचे दोन गट लागतात. एका गटाने कवितेचे एक कडवे किंवा एखादा श्लोक म्हणून खेळास प्रारंभ करावयाचा तर दुसऱ्या गटाने त्या कवितेच्या वा श्लोकाच्या शेवटी जे अक्षर आले असेल, त्या अक्षराने प्रारंभ होणारी कविता किंवा श्लोक म्हणावयाचा. अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो. जो गट हरतो, म्हणजेच प्रतिपक्षाने म्हटलेल्या कवितेच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारी कविता ज्या गटास म्हणत येत नाही, त्या गटावर भेंडी चढते, म्हणजे त्याच्या नावावर एक दंडगुण लागतो. असे दंडगुण ज्या गटाच्या नावावार अधिक तो गट या खेळात हरतो व त्याचा प्रतिपक्ष जिंकतो. या पद्धतीने दोन्ही गट आपापल्या पाठांतराची क्षमता जास्तीत जास्त पणाला लावतात. इतर अक्षरांपेक्षा सामान्यतः ल, ह, क्ष, ज्ञ यांपैकी एखादे अक्षर शेवटी सतत येत राहिले, तर विरोधी गटाची तिरपीट उडते. प्रतिपक्षावर मात करून लवकर भेंडी चढवण्यासाठी अशीच अक्षरे आपण म्हणावयाच्या कवितांच्या शेवटी येतील, अशा प्रकारे कौशल्य वापरले, तर लवकर यश मिळते. एकदा म्हटलेली कविता पुन्हा उपयोगात आणता येत नाही.
दोन्ही गटांतील खेळाडूंना सुरुवातील अनेक काव्ये माहीत असतात, तोपर्यंत हा खेळ भराभर चालतो. खेळात भाग घेणाऱ्या मुलांच्या पाठांतराचा साठा संपत आला, म्हणजे खेळ मंदावतो. तरीही परस्परांच्या स्मरणशक्तीला आव्हान मिळत असल्याने खेळात शेवटपर्यंत रंग भरतो. काव्यपंक्तींप्रमाणेच गावांची नावे, आडनावे, म्हणी इत्यादींवर आधारलेल्या भेंड्याही वरील तत्त्वानुसार खेळता येतात. म्हणींच्या भेंड्यांमध्ये एका गटाने एखाद्या म्हणीतील महत्त्वाचा सूचक शब्द सांगावा व त्यावरून दुसऱ्या गटाने ती संपूर्ण म्हण सांगावी, अशा प्रकारेही खेळता येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा