लगोरी
एक पारंपारिक खेळ. यास ‘लिंगोरचा’ असेही म्हणतात. संत एकनाथांच्या गाथेत या खेळाचा निर्देश आढळतो. पेशवाईतही तो खेळला जात असल्याचे उल्लेख सापडतात. या खेळात दोन संघ असतात. खेळाचा उद्देश म्हणजे यात असलेल्या लगोऱ्या एकावर एक ठेवणे. त्या चेंडूने विस्कळित करणे (म्हणजेच फोडणे) व परत विरुद्ध बाजूच्या संघाने ज्या चेंडूने लगोरी फोडली आहे, त्याच चेंडूने लगोऱ्या रचणाऱ्या संघास बाद करणे. पण असे बाद न होता जो संघ फोडलेली लगोरी अधिक वेळा लावील, तो संघ विजयी होतो.
या खेळात वापरल्या जाणाऱ्या चपट्या लाकडी गोल ठोकळ्यांनाही लगोरी म्हणतात. ही लगोरी पारंपरिक, विनसंयोजित खेळामध्ये फरशीच्या वा विटांच्या तुकड्यांची असे. मात्र आता बाजारात एकापेक्षा एक होत लहान जाणाऱ्या-देवळाच्या शिखराप्रमाणे, किंवा शंकूच्या आकारासारख्या निमुळत्या होत गेलेल्या-सात वर्तुळाकार, रंगीत, गोल आकारांचा लगोरी-संच मिळतो. त्या फोडण्यासाठी टेनिसचा चेंडू वापरतात.
लगोऱ्या व चेंडू एवढेच साहित्य, साधे-सोपे नियम आणि छोटसे मैदान यांमुळे हा खेळ बालकांना खेळण्यास सुलभ व प्रिय ठरतो. ६ ते १२/१३ वयोगटाच्या मुलामुलीसाठी हा खेळ साधारणपणे योग्य आहे.
या खेळासाठी १८.२८ मी. ते ३०.४८ मी. (६० ते १०० फुट) व्यासाचे एक वर्तुळ (क्रीडांगण) आखून घेतात. त्याची परिघरेषा ही अंतिम मर्यादा मानतात. या मोठ्या वर्तुळाच्या मध्यभागी १.८२ मी. (६ फुट) व्यासाचे एक छोटे वर्तुळ लगोरी ठेवण्यासाठी आखतात. लावताना लगोरीही येथेच रचावी लागते. सात वा अकरा खेळाडूंचे असे दोन संघ असतात. प्रत्येक संघातील एक-एक खेळाडू लगोरी फोडण्यास येतो. त्यास नेमक्षेत्रातून [क्रीडांगणाच्या मध्य-रेषेपासून ४.५७ मी. (१५ फुट) ते ९.१४ मी. (३० फुट) अंतरावर १.८२ मी. (६ फुट) लांबीची समांतर नेमरेषा आखतात. या रेषेभोवतीचा काटकोन चौकोन म्हणजे नेमक्षेत्र होय] लगोरी फोडण्य़ासाठी तीन वेळा चेंडू मारण्याची संधी मिळते. लगोरी फोडणारा लगोरीच्या एका बाजूला नेमक्षेत्रात व त्याचा लगोरी फोडता फोडता, लगोरीकडून मागे जाणारा चेंडू अडविण्यासाठी वा झेलण्यासाठी एक प्रमुख क्षेत्ररक्षक क्रिकेटमधील यष्टिरक्षकाप्रमाणे मागे उभा असतो. इतर १० क्षेत्ररक्षक आखलेल्या मोठ्या वर्तुळात लगोरी रचणाऱ्या खेळाडूंचा विचार करून उभे केलेले असतात.
प्रत्यक्ष खेळ व लगोरी होणे : लगोरी फोडणारा लगोरी फोडतानाही बाद होऊ शकतो. तो लगोरी फोडण्याचा प्रयत्न करीत असता त्याचा जमिनीवर टप्पा पडून उडालेला चेंडू जर लगोरीमागील किंवा शेजारील क्षेत्ररक्षकाने वरचेवर झेलला, तर तो बाद होतो. लगोरी फोडणाराने लगोरी फोडली, की उडालेला वा पडलेला चेंडू लगोरी रचणाऱ्या खेळाडूंपैकी एकानेच, एकदाच पायाने लाथाडायला परवानगी असते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे काम असते, ते लगोरी लावणे. ज्यांनी लगोरी फोडली आहे, त्याच संघातील खेळाडूंनी लगोऱ्या एकावर एक रचणे महत्त्वाचे असते. क्षेत्ररक्षकांचे अशा वेळी काम असते, लगोरी लावणाऱ्यांपैकी एकाला चेंडू मारणे. असा चेंडू एकाला जरी लागला, तरी सर्व संघ बाद होतो. मात्र क्षेत्ररक्षकांकडून चेंडू न लागता जर लगोरी रचली, तर त्या संघास एक गुण मिळतो. तथापि एखाद्या खेळाडूस चेंडू लागून तो संघ बाद झाला, तर दुसरा संघ खेळण्यास येतो. प्रत्येक संघाच्या सर्व खेळाडूंना लगोरी फोडण्याची संधी मिळेपर्यंत खेळ चालतो. ज्या संघाच्या अधिक लगोऱ्या होतात, म्हणजेच अधिक गुण होतात, तो संघ विजयी घोषित केला जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा